यजमान इंग्लंडची विजयी सलामी

By admin | Published: June 2, 2017 01:06 AM2017-06-02T01:06:53+5:302017-06-02T01:06:53+5:30

बांगलादेशने दिलेले ३०६ धावांचे आव्हान सहजपणे पार करताना यजमान इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दिमाखदार विजयी सलामी

Hosts England's winning opener | यजमान इंग्लंडची विजयी सलामी

यजमान इंग्लंडची विजयी सलामी

Next

लंडन : बांगलादेशने दिलेले ३०६ धावांचे आव्हान सहजपणे पार करताना यजमान इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दिमाखदार विजयी सलामी देत विजयी २ गुण मिळवले. जो रुटने तडाखेबंद नाबाद १३३ धावांची खेळी करत इंग्लंडच्या विजयाचा ‘रुट’ आखला. त्याचप्रमाणे कर्णधार इआॅन मॉर्गननेही त्याला उत्तम साथ देताना नाबाद ७५ धावांची खेळी करत मोलाचे योगदान दिले. इंग्लंडने ४७.२ षटकात २ बाद ३०८ धावा करुन बांगलादेशचा ८ विकेट्सने धुव्वा उडवला.
ओव्हल मैदानावर इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. मशरफी मोर्ताझाने सलामीवीर जेसन रॉयला (१) झटपट बाद करत इंग्लंडला धक्का दिला. मात्र अ‍ॅलेक्स हेल्स आणि रुट यांनी १५९ धावांची भागीदारी करुन बांगलादेशची हवा काढली. हेल्सने आक्रमक पवित्रा घेत प्रत्येक गोलंदाजाला चोपले. हेल्सचे शतक अवघ्या ५ धावांनी हुकले. शब्बीर रहमानने त्याला बाद केले. हेल्सने ८६ चेंडूत ११ चौकार व २ षटकारांसह ९५ धावांचा तडाखा दिला. यानंतर रुट - मॉर्गन यांनी नाबाद १४३ धावांची भागीदारी करुन इंग्लंडला विजयी केले. तत्पूर्वी, सलामीवीर तमिम इक्बालच्या (१२८) शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने निर्धारीत ५० षटकात ६ बाद ३०५ धावांची आव्हानात्मक मजल मारली. मुशफिकर रहीमनेही (७९) शानदार अर्धशतक झळकावून इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच पळवले. तमिमने कारकिर्दितील नववे शतक झळकावताना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेशकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळीही केली. त्याने १४२ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार ठोकताना १२८ धावांची दमदार खेळी केली. सरकार (२८) आणि इम्रुल कायेस (१९) फारशी चमक न दाखवता बाद झाल्यानंतर तमिम - रहिम यांनी सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. तमिमने चौफेर फटकेबाजी करताना इंग्लिश गोलंदाजांची लय बिघडवली. दुसरीकडे, रहिमने रहिमने ७२ चेंडूत ८ चौकारांसह ७९ धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या निर्णायक भागीदारीमुळे बांगलादेशची तिनशे धावांच्या दिशेने वाटचाल झाली.
इंग्लंडकडून प्लंकेटने ५९ धावांमध्ये ४ बळी घेत बांगलादेशला रोखण्याचा प्रयत्न केला. जॅक बॉल आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक बळी घेतला. दरम्यान, आयपीएल गाजवलेल्या स्टोक्सला गोलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवता आली नाही. (वृत्तसंस्था)

धावफलक
बांगलादेश : तमिम इक्बाल झे. बटलर गो. प्लंकेट १२८, सौम्य सरकार झे. बेरस्टो गो. स्टोक्स २८, इम्रुल कायेस झे. वूड गो. प्लंकेट १९, मुशफिकर रहिम झे. हेल्स गो. प्लंकेट ७९, शाकिब अल हसन झे. स्टोक्स गो. बॉल १०, शब्बीर रहमान झे. रॉय गो. प्लंकेट २४, महमुद्दुलाह नाबाद ६, मोसद्दक हुसैन नाबाद २. अवांतर - ९. एकूण : ५० षटकात ६ बाद ३०५ धावा. गोलंदाजी : ख्रिस वोक्स २-१-४-०; मार्क वूड १०-१-५८-०; जॅक बॉल १०-१-८२-१; बेन स्टोक्स ७-०-४२-१; लायम प्लंकेट १०-०-५९-४; मोइन अली ८-१-४०-०; जो रुट ३-०-१८-०.

इंग्लंड : जेसन रॉय झे. रहमान गो. मोर्तझा १, अ‍ॅलेक्स हेल्स झे. सुंझामुल इस्लाम गो. शब्बीर ९५, जो रुट नाबाद १३३, इआॅन मॉर्गन नाबाद ७५. अवांतर - ४. एकूण : ४७.२ षटकात २ बाद ३०८ धावा. गोलंदाजी : मशरफी मोर्तझा १०-०-५६-१; शाकिब अल हसन ८-०-६२-०; मुस्तफिझुर रहमान ९-०-५१-०; सौम्य सरकार २-०-१३-०; मोसद्दक हुसैन ७.२-०-४७-०; रुबेल हुसैन १०-०-६४-०; शब्बीर रहमान १-०-१३-०.

Web Title: Hosts England's winning opener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.