धोनी आणखी किती वर्ष कर्णधार ? - सौरव गांगुली
By admin | Published: May 10, 2016 03:23 PM2016-05-10T15:23:50+5:302016-05-10T15:23:50+5:30
महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कायम रहाण्याबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मनात साशंकता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - पुढच्या २०१९ मधील ५० षटकांच्या वर्ल्डकपपर्यंत महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कायम रहाण्याबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मनात साशंकता आहे. भारताचा माजी कर्णधार आणि आता क्रिकेट प्रशासकाच्या भूमिकेत असलेल्या गांगुलीने कर्णधारपदासाठी विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे.
जगातील प्रत्येक क्रिकेट संघ भविष्याचा विचार करुन त्या दृष्टीने योजना आखतो. भारतीय निवड समितीचे सदस्यही पुढच्या तीन-चार वर्षाचा विचार करता महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधार म्हणून पाहतात का ? असा सवाल गांगुलीने विचारला. तो इंडिया टुडेशी बोलत होता.
गांगुलीने नेहमीच धोनीची त्याच्या नेतृत्वाची स्तुती केली आहे. पण आता कर्णधार बदलण्याची वेळ आली आहे असे त्याला वाटते. कर्णधारपदासाठी गांगुलीची पहिली पसंती विराट कोहली आहे. धोनी गेली नऊ वर्ष कर्णधार आहे. प्रदीर्घ काळ तो कर्णधारपदावर आहे.
आणखी चार वर्ष कर्णधारपदावर रहाण्यास तो सक्षम आहे का ? त्याने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे आता तो फक्त टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट खेळतो असे गांगुली म्हणाला. गांगुली सध्या विराट कोहलीची स्तुती करत असतो. त्याने विराटची तुलना फुटबॉल लिजिंड मॅराडोनाशी केली होती.