...तरी सेरेना विल्यम्स, नोव्हाक जोकोव्हिच दावेदार
By admin | Published: August 29, 2016 01:43 AM2016-08-29T01:43:18+5:302016-08-29T01:43:18+5:30
पुरुषांमध्ये गतविजेता व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला नोव्हाक जोकोव्हिच आणि महिला विभागात अव्वल मानांकित सेरेना विलियम्स हे दिग्गज खेळाडू दुखापतीतून सावरत असले
न्यूयॉर्क : पुरुषांमध्ये गतविजेता व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला नोव्हाक जोकोव्हिच आणि महिला विभागात अव्वल मानांकित सेरेना विलियम्स हे दिग्गज खेळाडू दुखापतीतून सावरत असले, तरी आज, सोमवारपासून प्रारंभ होणाऱ्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. जोकोव्हिचच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्याला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आगेकूच करण्यात अपयश आले होते. त्याचप्रमाणे त्याला रिओ आॅलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
सेरेनाचा डावा खांदा दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तिला सिनसिनाटी स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. सेरेनाला रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावता आले नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या दोन्ही दिग्गज खेळाडूंना जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे, पण त्यासाठी हे खेळाडू फिट असणे आवश्यक आहे.
सेरेना यूएस ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरली तर ती सर्वांधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याच्या शर्यतीत स्टेफी ग्राफचा विक्रम मोडेल. त्याचप्रमाणे अमेरिकन ओपन स्पर्धेत सर्वांधिक सात विजेतेपद पटकावण्याचा ख्रिस एव्हर्टचा विक्रम मोडण्याची सेरेनाला संधी आहे. सेरेना क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यास उत्सुक आहे. सेरेनाला पहिल्या फेरीत एकटेरिना मकारोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या एंजेलिक केरबरला सिनसिनाटी ओपन जिंकून क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी होती, पण तिला अंतिम फेरीत पिल्सकोव्हाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आता ही जर्मनीची टेनिसपटू यूएस ओपनमध्ये जेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील आहे. सेरेना गेल्या १८३ आठवड्यांपासून अव्वल स्थानी कायम आहे. ग्राफचा १८६ आठवड्यांचा विक्रम मोडण्याची तिला संधी आहे.
तिसरे मानांकन प्राप्त स्पेनची खेळाडू गार्बाइन मुगुरुजा हिलाही अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे, पण त्यासाठी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत सेरेनाचा पराभव करणाऱ्या स्पेनच्या या खेळाडूला यूएस ओपनमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
पुरुष एकेरीचा विचार करता जोकोव्हिच व अन्य प्रतिस्पर्ध्यांच्या दुखापतीचा लाभ अँडी मरेला मिळण्याची शक्यता आहे. जोकोला रिओमध्ये सरावादरम्यान मनगटाच्या दुखापतीला सामोरे जावे लागले. मरे जेतेपदाचा दावेदार म्हणून या स्पर्धेत सुरुवात करणार आहे. त्याच्या सलग २२ सामन्यांचा विजय रथ गेल्या आठवड्यात सिनसिनाटी ओपनमध्ये मारिन सिलिचने रोखला होता.
यूएस ओपनमध्ये २०१० व २०१३ मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या राफेल नदालला चौथे मानांकन आहे. त्याने रिओ आॅलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते.
विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत सॅम क्वेरीविरुद्धच्या पराभवासाठी मनगटाची दुखापत कारणीभूत नव्हती. विम्बल्डनदरम्यान काही वैयक्तिक अडचणी होत्या. मी अद्याप पूर्णपणे फिट नसून स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी पूर्णपणे फिट होईल, अशी आशा आहे. - जोकोविच
विम्बल्डननंतर खांद्यातील दुखणे वाढले. त्यानंतर आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाली. तेथे तिसऱ्या फेरीत इलिना स्वितालिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आॅलिम्पिकसाठी मी लढतीच्या केवळ दोन दिवसांपूर्वी सराव केला होता.
- सेरेना