ललितासाठी शेकडो ग्रामस्थांचा जप !
By admin | Published: August 12, 2016 10:01 PM2016-08-12T22:01:09+5:302016-08-12T23:08:00+5:30
माण तालुक्यातील मोहीची कन्या सातारा एक्स्प्रेस ललिता बाबर हिला यश मिळावे, यासाठी तिच्या गावी शुक्रवारी शेकडो ग्रामस्थांनी होम केला.
Next
>ऑनलाइन लोकमत,
पळशी ( सातारा ), दि. 12 - रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहभागी झालेली माण तालुक्यातील मोहीची कन्या सातारा एक्स्प्रेस ललिता बाबर हिला यश मिळावे, यासाठी तिच्या गावी शुक्रवारी शेकडो ग्रामस्थांनी होम केला. महालक्ष्मी मंदिरात पहाटे आरती, होमहवन व मंत्रोच्चार करण्यात आले.
तीन हजार मीटर ट्रिपलचेस प्रकारात ललिता बाबरने वर्षापूर्वीच गुणवत्ता सिद्ध केली आहे. तिची मेहनत साऱ्या देशाने पाहिली आहे. तिची तीन हजार मीटर ट्रिपलचेस पात्रता फेरी शनिवार, दि. १३ रोजी असून, यात यशस्वी झाली तर मंगळवार, दि. १५ रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत ती पोहोचणार आहे. जिल्हाबरोबरच देशवासीयांच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्या आहेत.
ललिताला शुभेच्छा देण्यासाठी मोही पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ, महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात जमले होते. दीपक तंडे-बडवे यांनी मंत्रोच्चार, होमहवन, पूजाअर्चा केली. यावेळी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी देवीच्या मंत्राचा १०८ वेळा मंत्रोच्चार करत देवीने व महादेवाने ललिताला कृपाशीर्वाद द्यावेत, यासाठी होमहवन, पूजाअर्चा करण्यात आली. तसेच श्रीराम जयराम जय जय राम नामाचा जपही करण्यात आला. यावेळी ललिताप्रती पंचक्रोशीने दाखविलेली माया पाहून ललिताचे वडील शिवाजीराव बाबर भारावले होते.
यावेळी ललिताचे मार्गदर्शक शिक्षक ज्ञानेश काळे, भारत चव्हाण, सुखदेव देवकर, प्रा. बापूराव देवकर, दिलीप पिसाळ, शिवाजी देवकर, रामहरी चव्हाण, राजेंद्र देवकर, उपसरपंच देवराज कदम, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार, मुगुटराव पाटोळे, साहेबराव भगत, लक्ष्मण देवकर, हनुमंत कुदळे, आनंद बडवे, सचिन पवार उपस्थित होते.