हैदराबाद विजयी लय कायम राखण्यास उत्सुक
By admin | Published: May 2, 2017 01:30 AM2017-05-02T01:30:13+5:302017-05-02T01:30:13+5:30
सलग पराभवांमुळे बेजार झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला आयपीएलच्या दहाव्या पर्वात ‘करा अथवा मरा’ लढतीत फॉर्मात
नवी दिल्ली : सलग पराभवांमुळे बेजार झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला आयपीएलच्या दहाव्या पर्वात ‘करा अथवा मरा’ लढतीत फॉर्मात असलेल्या गत चॅम्पियन सनरायजर्स हैदराबाद संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या या लढतीत स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी दिल्ली संघापुढे विजय मिळवण्याचे लक्ष्य आहे.
गेल्या लढतीत उभय संघांची कामगिरी एकमेकांच्या उलट होती. दिल्लीला रविवारी किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ६७ धावांत गुंडाळले आणि १० गडी राखून विजय नोंदवला तर डेव्हिड वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स संघाने अव्वल स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा २६ धावांनी पराभव केला.
फिरोजशाह कोटला मैदानावर प्रदीर्घ कालावधीनंतर गृहमैदानावर सामना खेळणाऱ्या दिल्ली संघाला पराभवातून सावरण्याची संधीही मिळालेली नाही. स्पर्धेत आतापर्यंत काहीच त्यांच्या मनाप्रमाणे घडलेले नाही. द्रविडसारखे प्रशिक्षक संघासोबत असताना फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली आहे तर कर्णधार म्हणून अनुभवी झहीरच्या उपस्थितीतही गोलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
दिल्ली संघाने आठ सामन्यांत चार गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत हा संघ तळाच्या स्थानावर आहे. मंगळवारच्या लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर त्यांच्यासाठी प्लेआॅफसाठी पात्रचा मिळवण्याचा मार्ग बंद होईल. सनरायजर्सने १० सामन्यांत १३ गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत हा संघ तिसऱ्या स्थानी आहे. डेव्हिड वॉर्नरला सूर गवसल्यामुळे या संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. झहीर खान दुखापतग्रस्त असल्याने दिल्लीच्या अडचणीत भर पडली आहे. इंग्लंडचा सॅम बिलिंग्स राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मायदेशी परतणार आहे. ख्रिस मॉरिस व कागिसो रबादाही या आठवड्यात मायदेशी परतेल. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली डेअरडेव्हिल्स :- झहीर खान (कर्णधार), मोहम्मद शमी, शाहबाज नदीम, जयंत यादव, अमित मिश्रा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, करुण नायर, रिषभ पंत, सी वी मिलिंद, खलील अहमद, प्रत्युष सिंग, मुरुगन अश्विन, आदित्य तारे, शशांक सिंग, अंकित बावणे, नवदीप सैनी, कोरे अँडरसन, अँजेलो मॅथ्यूज, पॅट कमिन्स, कागिसो रबादा, ख्रिस मॉरिस, कार्लोस ब्रेथवेट, सॅम बिलिंग्स.
सनरायजर्स हैदराबाद :- डेव्हिड वार्नर (कर्णधार), तन्मय अग्रवाल, रिकी भुई, बिपुल शर्मा, बेन कटिंग, शिखर धवन, एकलव्य द्विवेदी, मोइजेस हेन्रिक्स, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, बेन लागलिन, अभिमन्यू मिथुन, मोहम्मद नबी, मोहम्मद सिराज, मुस्ताफिजूर रहमान, आशीष नेहरा, नमन ओझा, राशिद खान, विजय शंकर, बरिंदर सरन, प्रवीण तांबे, केन विलियम्सन व युवराज सिंग.