हैदराबाद संघावर राजस्थानी तडका भारी
By admin | Published: April 4, 2015 04:12 AM2015-04-04T04:12:37+5:302015-04-04T04:12:37+5:30
सुर्यप्रकाश सुवालका (५०) आणि अंकित लांबा (४४) या सलामीवीरांची आक्रमक फलंदाजी आणि अनिकेत चौधरी (३/१०) केलेला अचूक मारा या जोरावर
कटक: सुर्यप्रकाश सुवालका (५०) आणि अंकित लांबा (४४) या सलामीवीरांची आक्रमक फलंदाजी आणि अनिकेत चौधरी (३/१०) केलेला अचूक मारा या जोरावर राजस्थानने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या बाद फेरीत सलग दुसरा विजय मिळवताना हैदराबादला ८६ धावांनी लोळवले. बाद फेरीतील राजस्थानचा हा सलग दुसरा विजय असून हैदराबादला मात्र सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.
हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीची संधी दिली. मात्र हा निर्णय हैदराबादच्या चांगलाच अंगलट आला. सुर्यप्रकाश व अंकित यांनी जबरदस्त फटकेबाजी करताना ८.३ षटकांत ८२ धावांची सलामी दिली. यानंतर सुवालकाने आक्रमणाची सुत्रे स्वत:कडे ठेवताना ९ चौकारांसह ३२ चेंडुत ५० धावा कुटल्या. यानंतर मनजीत सिंग (१८) आणि राजेश बिष्णोई (३१) यांनी निर्णायक क्षणि केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने ७ बाद १८३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. रवी किरण, चामा मिलिंद आणि पगदाला नायडू यांनी प्रत्येकी २ बळी घेताना राज्स्थानला रोखण्याचा प्रयत्न केला.
या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव १८.५ षटकांत ९७ धावांत संपुष्टात आला. कर्णधार हनुमा विहारी (४६) आणि चामा मिलिंद (१०) या दोघांचा अपवाद वगळता हैदराबादच्या एकाही फलंदाजाला दुहेरी संख्या गाठता आली नाही. अनिकेत चौधरीने हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार पाडताना १० धावांत ३ खंदे फलंदाज माघारी पाठवले. तर अशोक मनेरीया आणि चंद्रपाल सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेत अनिकेतला चांगली साथ दिली. (वृत्तसंस्था)