हैदराबादी ‘सनरायझर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2016 02:48 AM2016-05-30T02:48:30+5:302016-05-30T02:48:30+5:30

अप्रतिम माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या नवव्या सत्राचे दिमाखात विजेतेपद पटकावताना बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ८ धावांनी लोळवले.

Hyderabadi 'Sunrayer' | हैदराबादी ‘सनरायझर’

हैदराबादी ‘सनरायझर’

Next


बंगळुरू : फलंदाजांनी केलेल्या तुफानी हल्ल्यानंतर गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या नवव्या सत्राचे दिमाखात विजेतेपद पटकावताना बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ८ धावांनी लोळवले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करून २०८ धावा उभारल्यानंतर बँगलोरला २०० धावांवर रोखले. संघात फारसे नावाजलेले खेळाडू नसताना हैदराबादने संपूर्ण स्पर्धेत सांघिक खेळाच्या जोरावर वर्चस्व राखले. विशेष म्हणजे २००९ व २0११ नंतर पुन्हा एकदा बँगलोरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २०८ धावांचा डोंगर रचला. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली व विध्वंसक फलंदाज ख्रिस गेल यांनी बँगलोरला तुफानी सुरुवात करून दिली. या दोघांचा धडाका पाहता बँगलोर किती षटकांत बाजी मारणार, याची उत्सुकता होती. मात्र, बेन कटिंगने धोकादायक गेलचा बळी मिळवून हैदराबादला मोठे यश मिळवून दिले.
गेलने केवळ ३८ चेंडंूत ७६ धावांचा तडाखा देताना ४ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी केली. यानंतर स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणार कोहलीही अर्धशतक झळकावून बाद झाला. कोहलीने ३५ चेंडंूत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा काढल्या. कोहली-गेल यांनी बँगलोरला ११४ धावांची वेगवान सलामी दिली. मात्र, तरीही बँगलोरच्या फलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही.
धडाकेबाज एबी डिव्हिलियर्सही केवळ ५ धावा काढून परतल्यानंतर बँगलोरच्या फलंदाजीला खिंडारच पडले. यानंतर लोकेश राहुल (११), शेन वॉट्सन (११), सचिन बेबी (१८), स्टुअर्ट बिन्नी (९) असे सर्वच प्रमुख फलंदाज फार काळ टिकू शकले नाही. कटिंगने २ बळी घेतले, तर बरिंदर सरन, मुस्तफिझूर रेहमान व बिपुल शर्मा यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. अखेरच्या ४ षटकांत भुवनेश्वर व मुस्तफिझूर यांनी टिच्चून मारा करताना बँगलोरच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. तत्पूर्वी, कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक, तर युवराज सिंग व बेन कटिंग यांनी केलेला तुफानी हल्ला या जोरावर सनरायझर्स हैदराबादने बँगलोरला २०९ धावांचे मजबूत आव्हान दिले. मधल्या षटकात धावगती मंदावल्यानंतर युवराज व कटिंग यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने हिमालय रचला. वॉर्नरने पुन्हा एकदा कॅप्टन इनिंग करताना ३८ चेंडंूत ८ चौकार व ३ षटकारांसह ६९ धावा फटकावल्या. तर, युवराजने २३ चेंडंूत ३८ आणि कटिंगने १५ चेंडंूत नाबाद ३९ धावांचा तडाखा दिला. ख्रिस जॉर्डन (३/४५) व श्रीनाथ अरविंद (२/३०) यांनी हैदराबादला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. (वृत्तसंस्था)
‘विराट’ विक्रम एका धावेने हुकला...
यंदाच्या आयपीएलमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला या वेळी क्रिकेट सम्राट सर डॉन ब्रॅडमन यांचा एकाच मालिकेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी होती. परंतु विराटला एका धावाने हा विक्रम मागे टाकण्यात अपयश आले. १९३० साली झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी ९७४ धावा चोपल्या होत्या, तर यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीने ९७३ धावा फटकावल्या.
>‘आयपीएल’चे आतापर्यंतचे विजेते
सनविजेताउपविजेतामोस्ट व्हॅल्युबल प्लेयर
२०१६सनरायजर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बँगलोरविराट कोहली
२०१५मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्जआंद्रे रसेल
२०१४कोलकाता नाईट राईडर्सकिंग्ज इलेव्हन पंजाबग्लेन मॅक्सवेल
२०१३मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्जशेन वॉटसन
२०१२कोलकाता नाईट राईडर्सचेन्नई सुपर किंग्जसुनील नरेन
२०११चेन्नई सुपर किंग्जरॉयल चॅलेंजर्स बंगळूरख्रिस गेल
२०१०चेन्नई सुपर किंग्जमुंबई इंडियन्ससचिन तेंडुलकर
२००९डेक्कन चाजर्सरॉयल चॅलेंजर्स बँगलोरअ‍ॅडम गिलख्रिस्ट
२००८राजस्थान रॉयलर्सचेन्नई सुपर किंग्जशेन वॉटसन

Web Title: Hyderabadi 'Sunrayer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.