हैदराबादचा मुंबईवर 85 धावांनी नेत्रदीपक विजय
By Admin | Published: May 8, 2016 07:25 PM2016-05-08T19:25:41+5:302016-05-08T21:24:38+5:30
सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सवर 85 धावांनी नेत्रदीपक विजय मिळवला आहे.
ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. 8- सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सवर 85 धावांनी नेत्रदीपक विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादनं दिलेलं 177 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची दमछाक उडाली आहे. मुंबई इंडियन्सला 16.3 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 92 धावा काढता आल्यात.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीला सुरुवात झाली. कुमारनं पार्थिव पटेलला धावचीत केले. तर नेहरानं भेदक गोलंदाजीच्या जोरावर शर्मा, रायुडू, बलटरचा तंबूत परत पाठवलं. सरणनं पांड्याला तर हेनरिकनं पोलार्डला घरचा रस्ता दाखवला आहे. रेहमाननं गोलंदाजीचं चमक दाखवून पांड्या, साऊथी, मेक्लॅघनचा बळी घेतला आहे.
विजयाची आशा बाळगून खेळणा-या सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्ससमोर 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कर्णधार वार्नरनं 33 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकार खेचत 48 धावा केल्यात. शिखर धवननं नाबाद 57 चेंडूंत 10 चौकार आणि 1 षटकार मारून 82 धावा काढून हाफसेंचुरी पार केली. विल्यमसन 2 धावा काढून तंबूत परतला आहे. युवराज सिंगनं 3 चौकार आणि 2 षटकार लगावत 39 धावा कुटल्यात. हेनरिक नाबाद खेळी करत 1 धावा काढली आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅक्लेघननं युवराज सिंगला धावचीत केलं. हरभजननं भेदक गोलंदाजीच्या जोरावर डेव्हिड वॉर्नर आणि विल्यमसनला तंबूत पाठवलं आहे.