हैदराबादचा ‘सूर्योदय’

By admin | Published: May 28, 2016 03:58 AM2016-05-28T03:58:48+5:302016-05-28T03:58:48+5:30

प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्याचा आपल्या खेळीवर कोणताही परिणाम होऊ न देता कर्णधार डेव्हीड वॉर्नरने नाबाद तडाखेबंद अर्धशतक झळकावत सनरायझर्स हैदराबादला

Hyderabad's 'Sunrise' | हैदराबादचा ‘सूर्योदय’

हैदराबादचा ‘सूर्योदय’

Next

नवी दिल्ली : प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्याचा आपल्या खेळीवर कोणताही परिणाम होऊ न देता कर्णधार डेव्हीड वॉर्नरने नाबाद तडाखेबंद अर्धशतक झळकावत सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या नवव्या सत्रात अंतिम फेरीत नेले. वॉर्नरच्या शानदार कॅप्टन इनिंग्जच्या जोरावर ‘हैदराबाद’ने गुजरात लायन्सविरुद्ध ४ विकेट्सने बाजी मारली. उद्या, रविवारी हैदराबादला विजेतेपदासाठी बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भिडावे लागेल.
फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ‘हैदराबाद’ने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना गुजरातला निर्धारित २० षटकांत ७ बाद १६२ धावांवर रोखले. यानंतर हैदराबादने वॉर्नरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १९.२ षटकात ६ बाद १६३ धावा फटकावल्या. शिखर धवन (०), मोइसेस हेन्रीकेस (११), युवराज सिंग (८), दीपक हुडा (४), बेन कटिंग (८) आणि नमन ओझा (१०) झटपट परतल्यानंतर ‘हैदराबाद’वर दडपण वाढले.
१६व्या षटकात ६ बाद ११७ अशी अवस्था असताना एका बाजूने खंबीरपणे उभ्या असलेल्या वॉर्नरने जबरदस्त कॅप्टन इनिंग करत अखेरपर्यंत नाबाद राहून संघाला एकहाती विजयी केले. त्याने ५८ चेंडंूत ११ चौकार व ३ षट्कारांसह नाबाद ९३ धावांचा तडाखा देऊन गुजरातच्या हातातील सामना हिसकावून घेतला. बिपुल शर्मानेही ११ चेंडंूत ३ षट्कारांसह २७ धावा कुटताना वॉर्नरला चांगली साथ दिली. शिवील कौशिक व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी २ बळी घेत ‘हैदराबाद’ला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला.
तत्पूर्वी, ‘गुजरात’ची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर एकलव्य द्विवेदी (५) व कर्णधार सुरेश रैना (१) लवकर बाद झाल्यानंतर ब्रेंडन मॅक्क्युलम व दिनेश कार्तिक (२६) यांनी संघाला सावरले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. बोल्टने कार्तिकला धावबाद करून ही जोडी फोडली. यानंतर मॅक्क्युलम (२९ चेंडंूत ३२), ड्वेन स्मिथ (१) झटपट बाद झाल्याने गुजरातचा डाव घसरला. मात्र, अ‍ॅरोन फिंचने ३२ चेंडंूत ७ चौकार व २ षट्कारांसह ५० धावा फटकावत गुजरातच्या धावसंख्येला आकार दिला. बेन कटिंग (२/२०) व भुवनेश्वर कुमार (२/२७) यांनी टिच्चून मारा केला. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक :
गुजरात लायन्स : २० षटकांत ७ बाद १६२ धावा (अ‍ॅरोन फिंच ५०, ब्रेंडन मॅक्क्युलम ३२, दिनेश कार्तिक २६; बेन कटिंग २/२०, भुवनेश्वर कुमार २/२७) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद : १९.२ षटकांत ६ बाद १६३ धावा (डेव्हीड वॉर्नर नाबाद ९३, बिपुल शर्मा नाबाद २७; शिवील कौशिक २/२२, ड्वेन ब्राव्हो २/३२).

Web Title: Hyderabad's 'Sunrise'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.