हैदराबादच्या विजयाचा ‘सन’राईज
By admin | Published: May 7, 2016 04:50 AM2016-05-07T04:50:48+5:302016-05-07T04:50:48+5:30
मुस्तफिजुर रहमान आणि भुवनेश्वर कुमार यांच्या धारदार गोलंदाजीनंतर शिखर धवन याने केलेल्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग
हैदराबाद : मुस्तफिजुर रहमान आणि भुवनेश्वर कुमार यांच्या धारदार गोलंदाजीनंतर शिखर धवन याने केलेल्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग सामन्यात शुक्रवारी गुजरात लायन्सचा ५ गडी राखून पराभव केला.
गुजरातला १२६ धावांत रोखल्यानंतर शिखर धवन (नाबाद ४७) याच्या झुंजार फलंदाजीच्या बळावर सनरायजर्सने १९ षटकांत ५ बाद १२९ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. धवनने त्याच्या ४0 चेंडूंच्या खेळीत ६ चौकार मारले. लायन्सकडून धवल कुलकर्णीने १७ धावांत २ गडी बाद केले. ड्वेन ब्राव्हो यानेही १४ धावांत २ गडी बाद केले; परंतु हे दोघे संघाला सलग तिसऱ्या पराभवापासून रोखू शकले नाहीत. सनरायजर्सने २१ एप्रिल रोजी राजकोट येथे लायन्सविरुद्ध झालेला सामनाही १0 गडी राखून जिंकला होता. सनरायजर्सचे आठ सामन्यात पाच विजयासह १0 गुण झाले आहेत तर सलग तिसऱ्या पराभवानंतर लायन्सचे १0 सामन्यात सहा विजयासह १२ गुण आहेत.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्सला वॉर्नरने (१७ चेंडूंत २४ धावा) वेगवान सुरुवात करुन दिली. वॉर्नरने प्रवीणला चौकार ठोकल्यानंतर प्रदीप सांगवान याला पुढील षटकात २ षटकार मारला; परंतु धवल कुलकर्णीच्या चेंडूवर तो प्रवीणच्या हाती झेल देऊन बसला. केन विलियम्सन (६) याने कुलकर्णीला चौकार मारत धावांचे खाते उघडले; परंतु तो प्रवीणच्या गोलंदाजीवर ड्वेन स्मिथच्या हाती झेल देऊन बाद झाला. सनरायजर्सच्या ५0 धावा नवव्या षटकात पूर्ण झाल्या. मोइजेस हेनरिक्सदेखील १६ चेंडूंत १४ धावा काढून तंबूत परतला. तथापि, धवनने एक बाजू लावून धरली. आयपीएल ९ मध्ये पहिला सामना खेळणाऱ्या युवराज १४ चेंडूंत ५ धावा काढून धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने सनरायजर्सची स्थिती ४ बाद ८१ अशी झाली होती.
सनरायजर्सला अखेरच्या ५ षटकात विजयासाठी ३६ धावांची होती. धवनने कुलकर्णीला तर दीपक हुडाने कौशिकला चौकार मारला. ब्राव्होने हुडाला कार्तिकरवी झेलबाद करीत लायन्सच्या आशा उंचावल्या. तथापि, नमन ओझाने १९ व्या षटकात प्रवीणला चौकार मारला आणि धवनने या षटकातील अखेरच्या २ चेंडूंवर चौकार मारत सनरायजर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, मुस्तफिजुर रेहमान आणि भुवनेश्वर कुमार यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सला ६ बाद १२६ धावसंख्येवर रोखले होते.
मुस्तफिजुर रेहमान (१६ धावांत २) आणि भुवनेश्वर कुमार (२८ धावांत २) यांनी गुजरात लायन्सला नियमित अंतराने धक्के दिले, तर आशिष नेहरा (४ षटकांत २३) याने किफायती गोलंदाजी करताना गुजरातवर दबाव कायम ठेवला. बरिंदर सरन (२१ धावांत १ गडी) आणि मोइजेस हेनरिक्स (२४ धावांत १ बळी) यांनीदेखील चांगली गोलंदाजी केली.
गुजरातकडून अॅरोन फिंचने ३ चौकार व एका षटकारासह नाबाद ५१ धावांची खेळी करताना गुजरात लायन्सला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. मात्र, अन्य फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाही. (वृत्तसंस्था)
धावफलक
गुजरात लायन्स : ड्वेन स्मिथ झे. मुस्तफिझुर रहमान गो. भुवनेश्वरकुमार १, ब्रँडन मॅक्युलम झे. वॉर्नर गो. हेन्रीक्स ७, सुरेश रैना झे. आणि गो. भुवनेश्वरकुमार २०, दिनेश कार्तिक झे. विल्यमसन गो. मुस्तफिझुर रहमान ०, अॅरोन फिंच नाबाद ५१, ड्वेन ब्राव्हो झे. (बदली खेळाडू) व्ही. शंकर गो. सरन १८, रवींद्र जडेजा झे. भुवनेश्वरकुमार गो. मुस्तफिझुर रहमान १८, प्रवीणकुमार नाबाद ६. एकूण २० षटकांत ६ बाद १२६ गोलंदाजी : ्भुवनेश्वर कुमार ४-०-२८-२, आशिष नेहरा ४-१-२३-०, मुस्तफिझुर रहमान ४-०-१७-२, बलिंदर सरन ३-०-२१-१, हेन्रीक्स ३-०-२४-१, युवराज सिंग २-०-१३-०
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हीड वॉर्नर झे. प्रविण कुमार गो. कुलकर्णी २४, शिखर धवन नाबाद ४७, केन विल्यमसन झे. स्मिथ गो. प्रविणकुमार ६, हेन्रीक्स झे. कार्तिक गो. ब्राव्हो १४, युवराज सिंग झे संगवान गो. कुलकर्णी ५, हुडा झे. कार्तिक गो. ब्राव्हो १८, नमन ओझा नाबाद ९एकूण १९ षटकांत ५ बाद १२९.
गोलंदाजी : प्रविणकुमार ४-०-२८-१, संगवान २-०-२८-०, कुलकर्णी ४-१-१७-२, कौशिक ४-०-२५-०, जडेजा २-०-१४-०,
ब्राव्हो ३-०-१४-२