हैदराबादचा ‘सनसेट’

By admin | Published: May 18, 2015 03:26 AM2015-05-18T03:26:17+5:302015-05-18T03:26:17+5:30

अत्यंत एकतर्फी झालेल्या निर्णायक सामन्यात मुंबई इंडियन्सने गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर लैंडल सिमेन्स आणि पार्थिव पटेल यांच्या

Hyderabad's 'Sunset' | हैदराबादचा ‘सनसेट’

हैदराबादचा ‘सनसेट’

Next

हैदराबाद : अत्यंत एकतर्फी झालेल्या निर्णायक सामन्यात मुंबई इंडियन्सने गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर लैंडल सिमेन्स आणि पार्थिव पटेल यांच्या दणकेबाज शतकी सलामीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचा ९ विकेट्सने फडशा पाडून दिमाखात प्ले आॅफमध्ये प्रवेश केला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत १६ गुणांसह थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली असून, उद्या, मंगळवारी होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबईचा सामना तगड्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध घरच्या वानखेडे स्टेडियमवर होईल.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी ११४ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मजबूत फलंदाजी असलेल्या मुंबईसमोर आधीच कमी धावसंख्येत बाद झाल्याने हैदराबादच्या गोलंदाजांमध्ये जोश दिसून आला नाही. त्यात सिमेन्स आणि पार्थिव यांनी ८० चेंडूत १०६ धावांची आक्रमक भागीदारी करून हैदराबादच्या आव्हानातली हवाच काढली. पार्थिवने अखेरपर्यंत नाबाद राहताना ३७ चेंडंूत ९ खणखणीत चौकार मारताना ५१ धावांचा तडाखा दिला, तर सिमेन्सने ४४ चेंडूत ४ चौकार व २ षट्कार खेचताना ४८ धावा काढल्या. मुंबईला विजयासाठी ८ धावांची गरज असताना सिमेन्स कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर कर्णला षट्कार ठोकून मुंबईचा विजय निश्चित केला. मुंबईने १३.५ षटकांत लक्ष्य गाठले.
तत्पूर्वी हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याने लसिथ मलिंगाला पहिल्याच षटकात चौकार मारून आपला इरादा स्पष्ट केला. मात्र, याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मलिंगाने धोकादायक फलंदाज शिखर धवनची यष्टी उखाडताना मुंबईला मोठे यश मिळवून दिले. पुढच्याच षटकातील पहिल्या चेंडूवर मिचेल मॅक्क्लेनघनला उंच फटका मारण्याच्या नादात कर्णधार वॉर्नर झेल देऊन परतला आणि हैदराबादचा संघ २ बाद ७ धावा अशा अडचणीत आला. मॅक्क्लेनघनने यानंतर इआॅन मॉर्गनचा (९) देखील अडसर दूर केला. मुंबईकरांच्या धडाक्यापुढे हैदराबादला पॉवर प्लेमध्ये २६ धावाच काढता आल्या.
दहाव्या षटकात जगदीश सुचिथने अप्रतिम मारा करत धोकादायक मोईसेस हेन्रीक्स (११) आणि नमन ओझा (०) यांना बाद करून हैदराबादची ५ बाद ५१ अशी अवस्था केली. यानंतर ठरावीक अंतराने मुंबईने यजमानांना धक्के दिले. लोकेश राहुल (२५) , कर्ण शर्मा (१५), आशिष रेड्डी (१७) आणि डेल स्टेन (नाबाद १९) यांच्या फटकेबाजीने यजमानांनी शंभरी पार केली. मॅक्क्लेनघनने यशस्वी मारा करताना १६ धावांत ३ फलंदाज बाद केले, तर मलिंगा (२/१७), सुचिथ (२/१४) यांनीदेखील हैदराबादला जखडवून ठेवण्यात मोलाचे योगदान दिले.

Web Title: Hyderabad's 'Sunset'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.