हैदराबादची शानदार सुरुवात
By admin | Published: April 7, 2017 03:50 AM2017-04-07T03:50:19+5:302017-04-07T03:50:19+5:30
इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वाचे शानदार उद््घाटन झाले.
सुनील गावसकर लिहितात...
इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वाचे शानदार उद््घाटन झाले. गत चॅम्पियन हैदराबादने प्रतिस्पर्ध्यापुढे मोठी धावसंख्या उभारली. गेल्या वर्षी अंतिम लढतीतही हैदराबादने एवढीच धावसंख्या उभारली होती. गमतीची बाब ही की बँगलोर संघही गेल्या वर्षीच्या अंतिम लढतीएवढीच धावसंख्या फटकावण्यात यशस्वी ठरला.
दरम्यान, उद््घाटन समारंभ निरुत्साहित करणारा होता, पण हैदराबादच्या दिग्गजांनी आपल्या चमकदार खेळीने क्रिकेटचे महत्त्व पटवून दिले. विशेषत: युवराज सिंगने. त्याने चमकदार फलंदाजी करताना प्रेक्षकांचे मनोरंजन केले. गेल्या मोसमातील कामगिरीत सातत्य राखताना हैदराबादच्या खेळाडूंची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण उल्लेखनीय ठरले. त्यांचा फॉर्म बघता मुस्तफिजूर पूर्णपणे फिट झाल्यानंतर त्यांना रोखणे अधिक कठीण ठरेल.
बँगलोर संघासाठी ही निश्चितच कठीण वेळ आहे. विशेषत: गेल्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि के. एल. राहुल यांची संघाला उणीव भासत आहे. दरम्यान, गेल्या वेळी या तिघांचा समावेश असतानाही हैदराबादने आरसीबीला रोखले होते. यावेळी त्यांच्यासाठी हे सोपे काम ठरले. कोहलीला आणखी काही सामने बाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. धरमशाला कसोटीत न खेळल्यामुळे त्याच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या मूर्ख लोकांसाठी ही चपराक आहे. विराटने त्या टीकाकारांच्या तुलनेत आपल्या देशाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. भारतीय कर्णधारच्या प्रतिबद्धतेवर प्रश्न उपस्थित करणे केवळ मूर्खपणा आहे.
कोलकाता संघाला गेल्या मोसमात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. यावेळी आक्रमक फलंदाज आंद्रे रसेलच्या अनुपस्थितीत संघातील अन्य सदस्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करीत त्याची उणीव भरून काढावी लागेल.
गंभीर आघाडीच्या फळीतील खेळाडू असून तो आपल्या नैसर्गिक शैलीने फलंदाजी करण्यात यशस्वी ठरला तर तो कोलकाता संघाला मोठी धावसंख्या उभारुन देऊ शकतो. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघाची दमछाक होऊ शकते. सुनील नरेन आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. मोजकेच फलंदाज त्याचे चेंडू ओळखण्यात यशस्वी ठरले आहेत. यंदाच्या मोसमात अनेक खेळपट्ट्या पाटा झालेल्या असल्यामुळे केकेआरसाठी नरेनची भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरणार आहे. आयपीएलमध्ये जास्तीत जास्त संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यास पसंती दर्शवितात, पण हैदराबाद संघाने जसे प्रथम फलंदाजी करीत सहज विजय मिळवला त्यामुळे अन्य संघाच्या मनोवृत्तीमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (पीएमजी)