... त्या घटनेचा मला खेद वाटतो : गावस्कर
By admin | Published: December 28, 2014 01:00 AM2014-12-28T01:00:17+5:302014-12-28T01:00:17+5:30
तीन दशकानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी विरोध व्यक्त करण्याच्या प्रकारावर खेद व्यक्त करताना माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे म्हटले आहे.
मेलबोर्न : मेलबोर्न क्रिकेट मैदानावरील बहुचर्चित घटनेच्या जवळजवळ तीन दशकानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी विरोध व्यक्त करण्याच्या प्रकारावर खेद व्यक्त करताना माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे म्हटले आहे.
भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान १९८१ मध्ये खेळल्या गेलेली मालिका खराब अंपायरिंगमुळे गाजली. डेनिस लिलीच्या इनकटरवर आपल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पंचाची भूमिका बजाविणाऱ्या रेक्स वाइटहेडने गावस्कर यांना पायचित दिले होते. गावस्कर यांच्या मते चेंडू बॅटला चाटून पॅडवर लागला होता. गावस्कर यांनी खेळपट्टी न सोडता विरोध दर्शविला.
पंचाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी गावस्करने बॅट आपल्या पॅडवर आपटली. गावस्कर ज्यावेळी पॅव्हेलियनमध्ये परतत होता त्यावेळी लिली याने टिपणी केल्यामुळे वाद निर्माण झाला, असे त्यावेळी प्रसारमाध्यमांतील वृत्तांमध्ये म्हटले आहे. गावस्कर माघारी फिरला व त्याचा सलामीचा सहकारी चेतन चौहानला खेळपट्टी सोडण्यास सांगितले.
चौहान यांनी कर्णधारचा आदेश पाळताना खेळपट्टी सोडली, पण सीमारेषेवर संघाचे व्यवस्थापक शाहिद दुर्रानी आणि सहायक व्यवस्थापक बापू नाडकर्णी यांनी त्यांना रोखले. चौहान डाव पुढे सुरू करण्यासाठी खेळपट्टीकडे गेले तर गावस्कर पॅव्हेलियनकडे परतले.
तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान शनिवारी दुसऱ्या दिवशी चहापानासाठी खेळ थांबला असताना संजय मांजरेकर व कपिल देव यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी झालेले गावस्कर म्हणाले,‘मला त्या निर्णयाचा खेद वाटतो. माझ्याकडून घडलेली ती मोठी चूक होती.भारतीय संघाचा कर्णधार म्हणून माझे वर्तन अयोग्य होते. मी कुठल्याही प्रकारे हे वर्तन योग्य असल्याचे सिद्ध करू शकत नाही. मी बाद होतो किंवा नाही, पण माझे वर्तन चुकीचे होते.’
गावस्कर पुढे म्हणाले,‘आजच्या काळात अशी घटना घडली असती तर माझ्यावर दंड ठोठावण्यात आला असता.’ कपिल त्यावेळी युवा होता. त्याचा तो केवळ दुसरा विदेश दौरा होता. कपिलने २८ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव ८३ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे भारताला तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत सोडविता आली. याबाबत बोलताना कपिल म्हणाला,‘त्यावेळी संघ गावस्कर यांच्यासोबत होता.’
कपिल म्हणाला,‘त्यावेळी मी युवा होतो. त्यामुळे प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या स्थितीत नव्हतो. पण, एक बाब मात्र स्पष्ट करतो की, त्यावेळी आम्ही सर्व आपल्या कर्णधारासोबत होतो. कर्णधार चूक आहे किंवा बरोबर याचा आम्ही विचार करीत नव्हतो तर आम्ही आमच्या कर्णधाराला साथ देत होतो. गावस्कर आता येथे बसून त्यावेळी चूक झाल्याचे कबूल करू शकतात, पण त्यावेळी मात्र आम्ही त्यांच्यासोबत होतो.’ (वृत्तसंस्था)