रोनाल्डोनं केली 'मन की बात'; मीच भारी! असं म्हणत शेअर केली आत्मविश्वास जपण्याची स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:08 IST2025-02-05T15:01:13+5:302025-02-05T15:08:53+5:30
खेळावरील प्रेम अन् आपल्या कामगिरीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन असावा तर असा

रोनाल्डोनं केली 'मन की बात'; मीच भारी! असं म्हणत शेअर केली आत्मविश्वास जपण्याची स्टोरी
फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्टियानो रोनाल्डो आपला ४० वा वाढदिवस साजरा करतोय. स्टार फुटबॉलरच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये चाहत्यांनीही रंग भरल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो. वयाच्या चाळीतही या पठ्ठ्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो. हीच गोष्ट त्याला फुटबॉलच्या जगतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक ठरवते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोनाल्डोनं दाखवून दिलं स्वत:च्या खेळावरील अन् कामगिरीवर प्रेम
जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण असा प्रश्न विचारला तर रोनाल्डो असं उत्तर ऐकायला मिळालं तर त्यात नवलं वाटण्याजोगे काहीच नाही. आता खुद्द रोनाल्डोनंही मीच भारी असं म्हणत आपल्या खेळावरील प्रेम अन् आपल्या कामगिरीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे.
नेमकं काय म्हणाला रोनाल्डो?
पोर्तुगालचा स्टार आणि रिअल माद्रिद माजी फुटबॉलर सध्या सौदी अरेबियाच्या क्लबकडून खेळताना दिसतो. बर्थडच्या निमित्ताने रोनाल्डोनं स्पॅनिश टेलिव्हिजसाठी एक खास मुलाखत दिलीये. यावेळी त्याने मी फुटबॉल जगतातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलर असल्याचे म्हटले आहे. फुटबॉल जगतात मी सगळ्यात भारी आहे, असे सांगताना रोनाल्डो म्हणाला की,
मी फुटबॉलच्या इतिहासातील महान फुटबॉलपटू आहे. मी गोल मैदानात डाव्या पायाचा अधिक वापर करत नाही. पण डाव्या पायाने गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या आघाडीच्या १० मध्ये माझा नंबर नक्की लागतो. ही आकडेवारी मी फुटबॉलच्या इतिहासातील एक परिपूर्ण खेळाडू असल्याचा पुरावा आहे.
आपल्या खेळाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला की, मी मैदानात डोक्यानं खेळतो अन् चांगल्या फ्री कीक मारण्यातही आघाडीवर असतो. मी वेगानं धावतो. माझा खेळ दमदार आहे. अन्य कुणी माझ्यापेक्षा भारी असू शकतं असा विचारच मी कधी केला नाही, असेही रोनाल्डोनं म्हटलं आहे. त्याचे हे वक्तव्य काहींना अहंकारी वाटू शकतं. पण त्याचं हे बोल नीट समजून घेतले तर सर्वोत्तम खेळाडूनं स्वत:वरील आत्मविश्वास कसा जपला पाहिजे, याचा संदेशच त्याने दिला आहे.
मेस्सी भारी असल्याचे मान्य केलं, पण आपणही कमी नाही यावरही दिलाय जोर
पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डोनं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक २०१७ सामने खेळले आहेत. त्याच्या खात्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर १३५ गोलची नोंद आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. रोनाल्डोनं याआधीही अनेकदा आपल्या मुलाखतीमध्ये फुटबॉल जगतातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू होण्याचा मानस बोलून दाखवला होता. कमालीच्या फिटनेस आणि मेहनतीच्या जोरावर त्याने ते करूनही दाखवलं. ज्या ज्या वेळी त्याला मेस्सी भारी की तू असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी या लोकप्रिय खेळाडूनं अर्जेंटिनाच्या मेस्सीचं नाव घेतल्याचेही पाहायला मिळाले आहे. पण त्याचे नाव घेताना तो आपणही कमी नाही, हे सांगायलाही मागे पडला नाही.