हिंदू धर्मग्रंथ वाचून शांतता मिळते; एकाच ऑलिम्पिकमध्ये ५ 'गोल्ड' जिंकणाऱ्या मुलीची 'मनःशांती की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 05:51 PM2019-02-19T17:51:26+5:302019-02-19T17:55:14+5:30

अमेरिकेच्या जलतरणपटूकडून हिंदू धर्माचं तोंडभरुन कौतुक

i Find Peace In Hinduism says 5 times olympic gold winner swimmer Missy Franklin | हिंदू धर्मग्रंथ वाचून शांतता मिळते; एकाच ऑलिम्पिकमध्ये ५ 'गोल्ड' जिंकणाऱ्या मुलीची 'मनःशांती की बात'

हिंदू धर्मग्रंथ वाचून शांतता मिळते; एकाच ऑलिम्पिकमध्ये ५ 'गोल्ड' जिंकणाऱ्या मुलीची 'मनःशांती की बात'

googlenewsNext

मोनॅको: एकाच ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्ण पदकांची कमाई करणारी जलतरणपटू मिसी फ्रँकलिननं हिंदू धर्माचं कौतुक केलं आहे. हिंदू धर्मग्रंथ वाचून मानसिक शांतता मिळते, असं फ्रँकलिननं म्हटलं. 23 वर्षांच्या फ्रँकलिननं गेल्याच वर्षी निवृत्ती स्वीकारत सर्वांनाच धक्का दिला. खांद्याच्या दुखापतीमुळे निवृत्त होत असल्याचं तिनं सांगितलं होतं. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचं प्रतिनिधीत्व केलेल्या फ्रँकलिननं निवृत्तीनंतर केवळ मनोरंजन म्हणून योग करण्यास सुरुवात केली. त्यातून तिला हिंदू धर्माची माहिती मिळाली. त्यानंतर तिच्या मनात अध्यात्माविषयी ओढ निर्माण झाली. आता ती जॉर्जिया विद्यापीठात धर्माशी संबंधित अभ्यास करत आहे.  

लॉरेस विश्व खेल पुरस्कारावेळी फ्रँकलिननं तिच्या धर्माशी संबंधित अभ्यासाची माहिती दिली. 'गेल्या वर्षभरापासून माझा अभ्यास सुरू आहे. हिंदू धर्मग्रंथ वाचून मला मानसिक शांतता आणि समाधान मिळालं. त्यामुळे माझे डोळे उघडले. विविध संस्कृती, त्यासंबंधित माणसं, त्यांच्या धार्मिक प्रथा-परंपरा याबद्दल वाचन करायला मला आवडतं,' असं तिनं सांगितलं. 'मी ख्रिश्चन धर्माची आहे. मात्र मला हिंदू आणि इस्लाम धर्म जास्त आवडतात. या दोन्ही धर्मांबद्दल मला फारशी माहिती नाही. त्यामुळेच मला दोन्ही धर्मांबद्दल खूप कुतूहल आहे. या धर्मांबद्दल वाचन केल्यानंतर त्यांच्याविषयीची ओढ आणखी वाढली,' असं लंडन ऑलिम्पिकमध्ये पाच सुवर्ण पदकं पटकावणाऱ्या फ्रँकलिननं सांगितलं. 

फ्रँकलिनची अभ्यासातील प्रगती अतिशय उत्तम आहे. तिला हिंदू धर्माबद्दल खूप माहिती आहे. रामायण आणि महाभारताबद्दल तिला खूप आकर्षण आहे. सध्या ती हे दोन्ही ग्रंथ वाचत आहे. 'त्या महाग्रंथामधल्या गोष्टी मला अविश्वसनीय वाटतात. त्यातील देवांविषयी जाणून घेणं मला खूप आवडतं. या दोन्ही ग्रंथांचं वाचन करण्याचा अनुभव सुंदर आहे. महाभारतातली सर्व नावं माझ्या लक्षात नाहीत. अनेकदा माझा थोडा गोंधळ उडतो. मात्र रामायणातील राम आणि सीतेबद्दल वाचायला मला प्रचंड आवडतं,' असं फ्रँकलिननं सांगितलं. 
 

Web Title: i Find Peace In Hinduism says 5 times olympic gold winner swimmer Missy Franklin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.