मला तब्बल ७ वेळा भाला फेकावा लागला! नीरज चोप्रा : 'गोल्डन' थ्रानतर सताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 10:32 AM2023-10-06T10:32:57+5:302023-10-06T10:33:28+5:30
हांगझाऊ : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बुधवारी भालाफेकीत ८८.८८ मीटरच्या थ्रोसह सुवर्ण जिंकले; पण स्पर्धेदरम्यान आयोजक ...
हांगझाऊ : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बुधवारी भालाफेकीत ८८.८८ मीटरच्या थ्रोसह सुवर्ण जिंकले; पण स्पर्धेदरम्यान आयोजक चीनकडून झालेल्या बेजबाबदारपणामुळे नीरजचा विजयसुद्धा वादग्रस्त ठरला. विश्वविजेता नीरजचा पहिलाच थ्रो जबरदस्त होता. बघताना साधारण अंदाजाने या थ्रोने ८५ मीटरचा टप्पा सहज पार केला असावा असे वाटते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे आयोजकांना थ्रो मोजताच आला नाही आणि नीरजला पुन्हा एकदा थ्रो करावा लागला. यामुळे सर्वच गोंधळून गेले असताना, नीरजने 'दुसऱ्या' वेळी केलेल्या पहिल्या प्रयत्नात ८२.३८ मीटर थ्रो केला व अखेरीस चौथा थ्रो (८८.८८ मी) फेकून त्याने सुवर्णपदक पटकाविले.
स्पर्धेनंतर घडलेल्या प्रकारावर नीरजने संताप व्यक्त केला. तो म्हणाला, 'मी गोंधळून गेलो होतो. आतापर्यंत जितक्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे त्यात हे कधीच घडले नाही. त्यांना लैंडिंग मार्कसुद्धा शोधता आला नाही. माझ्याकडे अन्य काही पर्याय नव्हता, वाद घालण्यातही अर्थ नव्हता. कारण यामुळे इतर स्पर्धकांवरसुद्धा परिणाम होणार होता. माझ्यामुळे इतर स्पर्धकांना वाट पाहावी लागत होती आणि त्यांचा मान ठेवण्यासाठी म्हणून मी शांत झालो.
तेव्हा खूप वारा होता आणि थंडी वाजत होती. त्यामुळे मग मी पुन्हा नंतर थ्रो करायचे ठरवले. स्पर्धेच्या नियमानुसार एका खेळाडूला सहाच वेळा थ्रो करता येतो; पण मी या स्पर्धेत तब्बल सात वेळा थ्रो केला. ' 'एवढ्या मोठ्या स्पर्धेतील माझा पहिला थ्रो वाया गेला याचे वाईट वाटले. ज्योती याराजीबाबतही असेच घडले, माझ्यासोबतही असेच घडले. थ्रोच्या वेळी जेनाला देखील याचा सामना करावा लागला. मी मोठ्या स्पर्धांमध्ये असे प्रकार कधीच पाहिलेले नाहीत. मी किंवा इतर खेळाडू पहिल्या ओनंतर निराश झाले असतो.