कठोर मेहनतीमुळे मी यशस्वी
By admin | Published: July 7, 2017 01:20 AM2017-07-07T01:20:36+5:302017-07-07T01:20:36+5:30
‘वयाच्या १२व्या वर्षापासून क्रीडाक्षेत्रात घेतलेल्या मेहनतीमुळे यश मिळवणे शक्य झालं. माझ्याकडे कोणतीही क्रीडा गुणवत्ता नव्हती, पण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘वयाच्या १२व्या वर्षापासून क्रीडाक्षेत्रात घेतलेल्या मेहनतीमुळे यश मिळवणे शक्य झालं. माझ्याकडे कोणतीही क्रीडा गुणवत्ता नव्हती, पण एक गुणवत्ता नक्की होती ती म्हणजे कठोर मेहनत घेण्याची तयारी. त्यामुळेच मी क्रीडाक्षेत्रात यशस्वी ठरलो,’ असे भारताचा आॅलिम्पिकमधील एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने म्हटले. एका नामांकित क्रीडा मासिकाच्या वतीने आयोजित क्रीडा पुरस्कार सोहळ्यामध्ये बिंद्राला जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी, रिओ आॅलिम्पिक रौप्य पदक विजेती शटलर पी. व्ही. सिंधूला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.
गुरुवारी रात्री मुंबईत झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यामध्ये बिंद्राचा गौरव करण्यात आला. ‘वयाच्या ३४व्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना खूप अवघडल्यासारखं वाटंत आहे,’ असेही बिंद्राने या वेळी मिश्किलपणे म्हटले. या सोहळ्यात सर्वोत्तम प्रशिक्षक पुरस्काराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपिचंद यांना हा पुरस्कार त्यांचीच शिष्या आणि स्टार शटलर सिंधूच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दरम्यान, या वेळी भारताचा युवा पुरुष हॉकी संघ, पॅरालिम्पियन सुवर्ण विजेता देवेंद्र झंझारिया, पॅरालिम्पियन सुवर्णविजेता मरियप्पन थंगवेलु, पॅरालिम्पियन कांस्यविजेता वरुण भाटी, हॉकीमध्ये भरीव योगदान दिलेले के. अरुमुघम, रेसर गौरव गिल, क्रिकेटपटू लोकेश राहुल, लुग रेसर शिवा केशवन, दीर्घ पल्ल्याचा धावपटू मिलिंद सोमन, पॅरालिम्पिक्समध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला दीपा मलिक यांनाही गौरविण्यात आले. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना या वेळी ‘लिविंग लिजेंड’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.