मी कोहलीप्रति सन्मान गमावला आहे
By admin | Published: March 7, 2017 12:40 AM2017-03-07T00:40:33+5:302017-03-07T00:40:33+5:30
भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून सातत्याने होत असलेल्या स्लेजिंगमुळे मी त्याच्याप्रति असलेला सन्मान गमावला
मेलबर्न : भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून सातत्याने होत असलेल्या स्लेजिंगमुळे मी त्याच्याप्रति असलेला सन्मान गमावला आहे, असे वक्तव्य आॅस्टे्रलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक इयान हिली यांनी केले. त्याच वेळी, आॅस्टे्रलियाचाच माजी सलामीवीर सायमन कॅटिचने मात्र या प्रकरणाला अधिक महत्त्व न देता, क्रिकेटच्या एका मर्यादेमध्ये या सर्व गोष्टी होतच असतात, असे म्हटले.
हिली यांनी याप्रकरणी पुढे सांगितले की, ‘‘कोहलीने आॅस्टे्रलियाचा अपमान केला आणि भारतीय कर्णधाराला आपल्या मैदानी आक्रमकतेला काही प्रमाणात कमी करण्याची गरज होती. त्याच्या या भूमिकेमुळे संघसहकाऱ्यांवरही दबाव येत आहे.’’ मात्र, हिली यांच्या वक्तव्याशी कॅटिच सहमत नाही. कॅटिच म्हणाला की, ‘‘दोन्ही संघांनी आपल्या मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. कसोटी क्रमवारीतील अव्वल दोन स्थानावरील संघांंमधील कसोटी मालिकेतील थरार हा उच्च असतो. तेव्हा या सर्व गोष्टी होणे अपेक्षितच आहे.’’
आॅस्टे्रलियाकडून ११९ कसोटी सामने खेळलेल्या हिली यांनी मेलबर्न रेडिओ स्टेशनवरील मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले की, ‘‘कोहलीवरील दबाव स्पष्ट दिसू लागला आहे. त्याच्याप्रति असलेला सन्मान मी गमावत चाललो आहे. त्याला आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा आदर राखण्याची आवश्यकता आहे. स्टीव्ह स्मिथसह त्याने जे काही केले ते अयोग्य होते.’’
दुसरीकडे, कॅटिचने कोहली आणि स्मिथने दबावाचा चांगल्याप्रकारे सामना केल्याचे म्हटले. त्याने सांगितले की, ‘‘माझ्या मते दोन्ही खेळाडू चांगल्याप्रकारे दबावाला सामोरे जात आहेत. या मालिकेत अनेक भावना जोडल्या गेलेल्या आहेत. भारतीय संघ बळी घेण्यास आसुसलेला होता.
स्मिथचा बळी किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव त्यांना होती. ईशांत-स्मिथ यांच्यातील प्रसंग सर्वांनाच धक्कादायक होता. परंतु, स्मिथसह ईशांतनेही संयम ठेवताना तो प्रसंग हसण्यावर नेला. एकूणच, दोन्ही कर्णधार कौतुकास पात्र आहेत. त्यांनी सामन्यातील स्थिती चांगल्याप्रकारे हाताळली आहे.’’ (वृत्तसंस्था)