मी मुलीमध्ये माझे क्रिकेट पाहतो
By admin | Published: July 4, 2017 01:37 AM2017-07-04T01:37:20+5:302017-07-04T01:37:20+5:30
आर्थिक परिस्थितीमुळे मला पुढे उच्चस्तरीय क्रिकेट खेळायला मिळाले नाही याची खंत आहे. आज माझे स्वप्न माझ्या मुलीने पुर्ण
रोहित नाईक/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘लहानपणापासून मला क्रिकेटचे वेड आहे. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे मला पुढे उच्चस्तरीय क्रिकेट खेळायला मिळाले नाही याची खंत आहे. आज माझे स्वप्न माझ्या मुलीने पुर्ण केल्याचा आनंद आहे. तीच्यामध्ये आज मी माझे क्रिकेट पाहतोय,’ अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची सलामीवीर पूनम राऊतचे वडील गणेश राऊत यांनी ‘लोकमत’कडे दिली.
रविवारी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात पूनमने निर्णायक खेळी केली. भारताचे मुख्य फलंदाज अपयशी ठरल्यानंतर पूनमने खंबीरपणे उभे राहत ४७ धावांची खेळी केली. भारताने पाकिस्तानला ९५ धावांनी नमवल्यानंतर पूनमच्या बोरीवली एमएचबी कॉलनी येथील घरासमोर रहिवाशांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पूनमच्या खेळीविषयी गणेश यांनी सांगितले की, ‘तीच्या खेळीचा अभिमान आहे. ती खेळपट्टीवर उभी राहिल्याने खूप फरक पडला. तीचे अर्धशतक ३ धावांनी हुकले, परंतु त्याची खंत नाही. ती एक बाजू लढवत होती याचा अधिक आनंद आहे.’ तसेच, ‘स्मृती मानधना, मिताली राज झटपट परतल्यानंतर दडपण आले होते. परंतु, पूनमचे प्रशिक्षक संजय गायतोंडे सर यांनी जिंकण्याचा विश्वास दिल्यानंतर जीवात जीव आला. भारताने १३० हून अधिक धावा केल्या, तर पाकिस्तानला जिंकणे कठीण होईल, असे सरांनी सांगितले आणि तसेच झाले,’ असेही गणेश यांनी यावेळी सांगितले.
पूनमला लहानपणापासून क्रिकेटसाठी पाठिंबा देणारे गणेश अमेरिकन स्कूलमध्ये कार चालक म्हणून नोकरी करतात. पूनमची आई गीता गृहिणी असून तिचा लहान भाऊ विपुल परदेशात हॉटेल क्षेत्रात कार्यरत आहे. आपले क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मुलीने पुर्ण केल्याचे अभिमानाने सांगताना गणेश म्हणतात की, ‘आज परिसरातील अनेक मुलींसह मुलेही पूनमकडे पाहून क्रिकेटकडे वळाली आहेत. तीच्याकडून टिप्स घेण्यासाठी अनेकजण घरी येतात आणि पूनम प्रत्येकाशी गप्पा मारते. तीला लक्झरी लाईफची फारशी आवड नाही. तीला फक्त देशासाठी क्रिकेट खेळायची आहे. तीचा जन्म केवळ क्रिकेट खेळण्यासाठी झालेला आहे.’
रविवारी आम्ही माथेरानला पूनमचे प्रशिक्षक गायतोंडे सरांसह सामना पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी, भारताच्या फलंदाजीनुसार आम्ही मुंबईचा प्रवास ठरवला. फलंदाजी झाल्यावर आम्ही मुंबईला निघालो. घरी येईपर्यंत भारताने बाजी मारली होती आणि परिसरातील लोकांनी आमचे जोरदार स्वागत केले. - गणेश राऊत
बोरीवली एमएचबी कॉलनी येथे मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
वडिल गणेश यांनी पूनमला खेळण्यास पाठिंबा दिला, तर आई गीता यांनी कायम तिच्या अभ्यासाकडे लक्ष दिले.
शिवसेवा, पय्याडे अशा क्लबमधून पूनमने स्थान निर्माण केले.
१२वीला असताना पूनमची भारताच्या संभाव्य संघात निवड झाली.
प्रत्येक सामन्याआधी पूनम कुटुंबियांना कॉल करते.
साईभक्त असलेली पूनम प्रत्येक दौऱ्यावर जाण्याआधी न चुकता शिर्डीला जाते.