युवराजला खेळताना पाहून मी क्लब क्रिकेटर असल्याचं वाटत होतं - विराट कोहली
By admin | Published: June 5, 2017 10:25 AM2017-06-05T10:25:10+5:302017-06-05T10:25:10+5:30
आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानविरोधात पहिल्याच सामन्यात युवराज सिंगने तुफान फटकेबाजी करत विरोधी संघाना आपली चुणूक दाखवून दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 5 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानविरोधात पहिल्याच सामन्यात युवराज सिंगने तुफान फटकेबाजी करत विरोधी संघाना आपली चुणूक दाखवून दिली आहे. युवराजने फक्त 32 चेंडूत 53 धावा केल्या. त्याच्या या दमदार खेळीचं कर्णधार विराट कोहलीनेही कौतुक केलं आहे. "युवराजला खेळताना पाहून मला त्यांच्यासमोर क्लब क्रिकेटर असल्यासारखं वाटत होतं", असं विराट कोहली बोलला आहे. तसंच संघाची कामगिरी चांगली असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.
कर्णधार विराट कोहलीने सांगितलं की, "मला धावा करण्यात अडचण येत असताना युवराज सिंगने सर्व दबाव आपल्यावर घेतला. ज्याप्रकारे युवराज सिंग फटकेबाजी करत होता ते पाहून मी आवाक झालो होतो. युवराज सिंगच्या समोर मी एक क्लब क्रिकेटर असल्यासारखं मला वाटत होतं". नुकतंच आजारपणातून उठलेल्या युवराज सिंगने जबरदस्त खेळी केली, आणि त्यामुळेच त्याला "मॅन ऑफ द मॅच" म्हणून निवडण्यात आलं.
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर विराट कोहलीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विराटने सांगितलं की, "युवराज सिंगच्या आधी आमच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. मी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाबतीत समाधानी आहे. आमच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली, तसंच गोलंदाजांनीही चांगलं प्रदर्शन केलं. मला वाटतं क्षेत्ररक्षणात मात्र आम्ही कमी पडलो. फलंदाजी आणि गोलंदाजीला मी 10 पैकी 9 गुण देतो, पण क्षेत्ररक्षणात फक्त 6 गुण देईन. येणा-या पुढील सामन्यांमध्ये आम्ही क्षेत्ररक्षणात सुधार करु".
युवराज सिंगनेही आपल्या खेळीवर आनंद व्यक्त केला. पाकिस्तानविरोधात मी चांगलं प्रदर्शन दाखवू शकलो याचा मला आनंद असल्याचं त्याने सांगितलं. तसंच युवराजने आपली ही तुफानी खेळी कॅन्सर पीडितांना समर्पित केली. युवराजने यावेळी लंडन दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहिली. युवराजने संघाला चांगली सुरुवात करुन देणारी सलामी जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवनचंही कौतुक केलं.