या प्रकरणात मला अडकविण्यात आले
By admin | Published: February 22, 2017 01:17 AM2017-02-22T01:17:07+5:302017-02-22T01:17:07+5:30
भारताचा अव्वल दर्जाचा रायफल नेमबाज संजीव राजपूतने आपल्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाचे खंडन
नवी दिल्ली : भारताचा अव्वल दर्जाचा रायफल नेमबाज संजीव राजपूतने आपल्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाचे खंडन करताना, या प्रकरणामध्ये मला अडकविण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी राजपूतने मौन धरले होते, मात्र अखेर त्याने याबाबत आपली बाजू स्पष्ट केली.
विश्वचषक, आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेता असलेल्या राजपूतवर राष्ट्रीय स्तरावरील सहकारी महिला नेमबाजने बलात्काराचा आरोप केला होता. त्या महिला खेळाडूने भारतीय दंड संहिता अंतर्गत ३७६ आणि ३२८ या कलमांतर्गत प्राथमिक तक्रार नोंदवली होती.
दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये सराव सूत्रानंतर सांगितले, की ‘तुम्हा सर्वांनाच माहितीय, की माझ्यासाठी मागील काही महिने खूप त्रासदायक होते. माझ्यासाठी हा काळ खूप कठीण होता.’ दरम्यान, मोसमातील पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज असलेला राजपूत या कठीण काळातून स्वत:ला सावरत आहे. जेव्हा त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाची बातमी पसरली तेव्हा राजपूतने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती.
याबाबत विचारले असता राजपूत म्हणाला, ‘मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. कोणतीही व्यक्ती याप्रकारच्या प्रसंगातून जाताना नक्कीच चिंतीत होईल. मात्र, मी या प्रसंगाला एक आव्हान म्हणून सामोरे जात असून भविष्यात चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा घेत पुढे जात आहे.’
त्याचप्रमाणे, ‘कोणतीही व्यक्ती कितीही मजबूत असो, अशा प्रकारच्या घटनाने ती व्यक्ती निश्चित हादरते. मी देखील हादरलो होतो. परंतु, मला माहित आहे की मी निर्दोष आहे. न्यायव्यस्थेवर माझा विश्वास असून सत्य सर्वांसमोर येईल,’ असेही राजपूतने सांगितले. (वृत्तसंस्था)