‘त्या’ कृत्याबद्दल मी माफी मागणार नाही : सुआरेझ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 05:46 AM2022-12-02T05:46:38+5:302022-12-02T05:47:01+5:30
त्या घटनेला आता १२ वर्षे झाली; पण आफ्रिकेतील देशात सुआरेझची ओळख ‘शैतान’ अशी निर्माण झाली.
अभिजीत देशमुख
दोहा : यंदा विश्वचषकाचा ड्रॉ जाहीर झाला तेव्हा घाना आणि उरुग्वे एकाच गटात आले. दोन्ही संघांचे जगात मोठे पाठीराखे नाहीत, तरीही शुक्रवारी उभय संघात होणाऱ्या लढतीकडे साऱ्या जगाचे लक्ष असेल.
सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत बार्सिलोनाचा माजी स्टार स्ट्रायकर सुआरेझला घाना विरुद्ध उरुग्वेच्या २०१० च्या विश्वचषकात उपांत्यपूर्व सामन्यात स्वत:च्या हाताने चेंडू जबरीने थांबवल्याच्या घटनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुआरेझने माफी मागण्यास नकार दिला. त्याने घानाला अतिरिक्त वेळेत विजय नोंदविण्यापासून रोखले आणि विश्वचषकाबाहेर ढकलले. त्या घटनेला आता १२ वर्षे झाली; पण आफ्रिकेतील देशात सुआरेझची ओळख ‘शैतान’ अशी निर्माण झाली.
घानाचा एक पत्रकार म्हणाला, ‘लोक तुला शैतान समजतात.’ त्यावर सुआरेझने उत्तर दिले की, ‘मी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. घानाच्या खेळाडूने पेनल्टी चुकवली, मी नाही. एखाद्याला दुखापत झाली असती तर मी माफी मागितली असती शिवाय रेड कार्डदेखील स्वीकारले असते.’ घानाच्या हृदयावर कोरली गेलेली ही कटू स्मृती पुसून काढण्यासाठी त्यांच्या खेळाडूंना शुक्रवारी सुआरेझ आणि उरुग्वेच्या त्या कृत्याचा हिशेब चुकता करण्याची मोठी संधी असेल