शैली सिंगने माझा विक्रम मोडल्यास आनंद होईल - अंजू बॉबी जॉर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:39 AM2021-08-24T05:39:44+5:302021-08-24T05:39:54+5:30
वयाच्या १३ व्या वर्षी शैली राष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत पाचव्या स्थानी होती. झांशी येथे जन्मलेल्या या खेळाडूला आईने मोठे केले. शैलीकडे नीरज चोप्रा, हिमा दास यांच्याप्रमाणेच ॲथलेटिक्स स्टार म्हणून पाहिले जाते.
नवी दिल्ली : ‘उंचीने लहान, सडपातळ बांधा असलेली शैली सिंग सोबतच्या खेळाडूंमध्ये कुठेही फिट बसत नव्हती. तरीही लांब उडीतील प्रसिद्ध खेळाडू अंजू बॉबी जॉर्जने शैलीतील गुण ओळखले. हार न मानण्याची स्वत:मधील वृत्ती शैलीमध्ये असल्याची जाणीव होताच अंजूने तिच्यावर मेहनत घेतली. शैली सिंगने रविवारी नैरोबीत जागतिक युवा (२० वर्षांखालील) ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रौप्य पदकाची कमाई केली. १७ वर्षीय शैलीचे सुवर्ण एक सेंटिमीटरच्या फरकाने हुकल्याचे शल्य ती लपवू शकली नाही. शैलीने अंतिम फेरीमधील तिसऱ्या प्रयत्नात ६.५९ मीटर अंतरावर उडी मारत आघाडी मिळवली; परंतु स्वीडनच्या मॅजा अश्कागने चौथ्या प्रयत्नात ६.६० मीटर उडी घेत शैलीला मागे टाकले. मॅजाची हीच उडी सुवर्ण पदकाची दावेदार ठरली.
वयाच्या १३ व्या वर्षी शैली राष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत पाचव्या स्थानी होती. झांशी येथे जन्मलेल्या या खेळाडूला आईने मोठे केले. शैलीकडे नीरज चोप्रा, हिमा दास यांच्याप्रमाणेच ॲथलेटिक्स स्टार म्हणून पाहिले जाते.
शैलीबाबत २००३ ची जागतिक स्पर्धेतील कांस्य विजेती अंजू म्हणाली,‘शैलीचे शरीर व मांसपेशी लांब उडीला अनुकूल आहेत. तिचा दृढ निश्चय पाहून दीर्घकाळ मैदान गाजवेल याची मनोमन खात्री पटली. ती लवकर शिकते, शिवाय नवीन गोष्टी आत्मसात करण्याच्या प्रयत्नांत असते. कधीही हार न मानण्याची वृत्ती असल्याने ती माझ्यासारखीच आहे. यामुळेच मी आणि माझे पती रॉबर्ट प्रभावित झालो. यानंतर विशाखापट्टणमच्या राष्ट्रीय स्पर्धेत शैलीला पुन्हा पाहताच प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या काळात आम्ही शैलीला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. तिला बेंगळुरूच्या साई केंद्रात पाठविले.’
आईने घडवले शैलीला
शैली सिंगची वाटचाल फारच प्रेरणादायी आहे. १७ वर्षांच्या या मुलीने गरिबीवर मात करीत देशाची पताका उंचावली. शैलीला आई वनितासिंग यांनी शिवणकाम करून घडवले. शैलीसह त्यांनी तीन मुलींचा सांभाळ केला. वडील नसल्याने आईने मुलींना पित्याची माया दिली. आर्थिक चणचणीमुळे रोजच्या जेवणासाठी अनेक तास शिवणकाम चालायचे. शैलीकडे स्पाईकसाठी पैसे नव्हते. मात्र, २०१४ पासून शैलीच्या आयुष्याला कलाटणी लाभली.