ICC Champions Trophy 2017: भारताचे मिशन सेमीफायनल

By admin | Published: June 7, 2017 08:46 PM2017-06-07T20:46:44+5:302017-06-07T20:46:44+5:30

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यावर गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या खेळल्या जाणाऱ्या सामन्याकडे भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

ICC Champions Trophy 2017: India's Semi-finals | ICC Champions Trophy 2017: भारताचे मिशन सेमीफायनल

ICC Champions Trophy 2017: भारताचे मिशन सेमीफायनल

Next

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 7 - भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यावर  गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या खेळल्या जाणाऱ्या सामन्याकडे भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या सामन्यात कामगिरीची पुनरावृती करीत भारतीय संघ उपांत्य फेरीकडे कूच करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. कर्णधार विराट कोहली तसेच कोच अनिल कुंबळे यांच्यातील मतभेदाचे वृत्त मागे सोडून भारतीय संघाने ब गटात पाकला १२४ धावांनी नमवित शानदार सलामी दिली. पावसाच्या व्यत्ययामुळे ४८ षटकांच्या सामन्यात ३ बाद ३१९ धावा उभारल्यानंतर पाकपुढे २८९ धावांचे आव्हान होते. त्यांचा संघ १६४ पर्यंतच मजल गाठू शकला.
दुसरीकडे लंकेची सुरुवातही निराशादायी झाली. ओव्हलवर द. आफ्रिकेने त्यांचा ९६ धावांनी पराभव केला. लंकेचे गोलंदाज प्रभाव टाकण्यात अपयशी ठरले शिवाय फलंदाजांनी निराशाच केली. सध्याचा फॉर्म आणि संघ नियोजन बघता सामन्यात भारताचे पारडे जड आहे. तरीही आत्मसंतुष्ट राहणे संघासाठी नुकसानदायी ठरू शकते याची जाणीव कोहलीला आहे. वन डे क्रिकेटमध्ये सामन्याचे चित्र पालटण्यास वेळ लागत नाही. लंकेसाठी हा सामना करा किंवा मरा असाच आहे. त्यामुळे विजयासाठी हा संघ ताकद पणाला लावेल.
पाकविरुद्ध काही सहजसोपे झेल सोडण्याचा अपवाद वगळता क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली. आघाडीच्या फलंदाजांनी धावांचे योगदान दिले. रोहित शर्मा, शिखर धवन, कोहली, युवराजसिंग यांनी अर्धशतके ठोकली. लंकेविरुद्ध ते अशीच खेळी करण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने गोलंदाजीत कहर केला. हार्दिक पांड्या दोन्ही आघाडीवर यशस्वी ठरला तर रवींद्र जडेजा याने फिरकीची बाजू चोखपणे सांभाळल्याने लंकेविरुद्ध मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांना स्थान मिळणे कठीण वाटते.
याच मैदानावर झालेल्या मागच्या सामन्यात लंकेचे फलंदाज इम्रान ताहिरच्या फिरकी माऱ्यापुढे चाचपडत राहिले. ओव्हलची खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरली तर जडेजा कर्दनकाळ ठरू शकतो. अश्विन बाहेर असेल तरी युवराज व केदार जाधव
यांची त्याला साथ लाभू शकते. लंकेसारख्या संघाला चारीमुंड्या चीत करण्यासाठी क्षेत्ररक्षणातही लक्षणीय सुधारणा करण्याची गरज कोहलीने बोलून दाखविली. भारताचे संघ संयोजन निश्चित असले तरी लंकेची स्थिती दोलायमान आहे. आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर काळजीवाहू कर्णधार उपुल थरंगा याच्यावर कूर्मगती गोलंदाजीबद्दल दोन सामन्याचे निलंबन लावण्यात आले. तो भारताविरुद्ध खेळू शकणार नाही. आनंदाची बाब अशी की त्यांचा नियमित कर्णधार अँजलो मॅथ्यूज दुखापतीतून सावरला आहे पण थरंगाची उणीव जाणवेल. त्याने द. आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक ५७ धावा ठोकल्या होत्या. त्याच्याजागी निरोसन डिकवेला किंवा कुसाल परेरा यापैकी एकाला संधी दिली जाईल.मधल्या फळीत कुसाल मेंडिस, दिनेश चांदीमल आणि चमारा कापुगेदरा यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी असेल. मॅथ्यूज परतल्यामुळे मधल्या फळीला बळ मिळाले आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात मॅथ्यूजने ९५ धावा केल्या होत्या. गोलंदाजी मात्र लंकेची कमकुवत बाजू आहे. लसिथ मलिंगावर हा संघ विसंबून असून सुरंगा लखमल, नुवान प्रदीप आणि असेला गुणरत्ने हे तितके प्रभावी वाटत नाहीत. अष्टपैलू तिसारा परेरा याला भारताविरुद्ध स्थान मिळण्याची शक्यता आहे. फिरकीपटू सीकुगे प्रसन्ना हा देखील प्रभावी मारा करण्यात अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)
उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराजसिंग, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन.
श्रीलंका :अँजेलो मॅथ्यूज(कर्णधार), दिनेश चांदीमल, निरोशन डिकवेला, चमारा कापुगेदरा, कुसाल मेंडिस, कुसाल परेरा, तिसारा परेरा, सीकुगे प्रसन्ना, नुवान प्रदीप, सुरंगा लखमल, लक्ष्मण संदाकन, लसित मलिंगा, असेला गुणरत्ने आणि नुवान कुलशेखरा.

लढतीची वैशिष्ट्ये...
दोन आशियाई संघांमधील सामना हे भारत-श्रीलंका सामन्याचे वैशिष्ट्य आहे. लसिथ मलिंगाचा वेगवान मारा श्रीलंकेच्या गोलंदाजीचा कणा आहे. पण सध्या मलिंगाच्या आक्र मणात धार नाही. सलामीला पराभव पत्करल्यानंतर आव्हान टिकवण्यासाठी लंकेला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी शतकी सलामी दिली होती. श्रीलंकेचे गोलंदाज सुरुवातीच्या १० षटकांमध्ये अपयशी ठरत असल्याने भारतीय फलंदाजांना धावा काढणे फारसे कठीण जाणार नाही. याउलट जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारतीय गोलंदाजीचा सामना करण्याचे आव्हान श्रीलंकेच्या फलंदाजांना पेलावे लागणार आहे.

सामना :दुपारी ३ वाजेपासून(भारतीय वेळेनुसार)
थेट प्रक्षेपण:स्टार स्पोर्टस् १ आणि स्टार स्पोर्टस् ४ वर
आमने सामने
भारत-श्रीलंका
१४९ सामने
भारत विजयी
८३
श्रीलंका विजयी
५४
त्रयस्थ ठिकाणी झालेल्या लढती
४५
भारत विजयी
२६
श्रीलंका विजयी
१६
पावसाची चिंता कायम...
भारतासाठी एकमेव चिंतेची बाब अशी की हवामान बदलणारे असेल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सामन्यादरम्यान मुसळधार पावसाची ४० टक्के शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. संघाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल. संघातील युवा खेळाडूंच्या बळावर आत्मविश्वासासह पाकचा पराभव केला. आमच्यासाठी तो मोठा विजय होता. लंकेविरुद्ध कामगिरीची पुनरावृत्ती होईल. 
- विराट कोहली

Web Title: ICC Champions Trophy 2017: India's Semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.