ICC Champions Trophy : इंग्लंडची बांगला देशविरुद्ध सलामी

By admin | Published: May 31, 2017 07:38 PM2017-05-31T19:38:25+5:302017-05-31T19:51:36+5:30

यजमान इंग्लंड आणि बांगला देश यांच्यातील सलामी लढतीने उद्या गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी वन डे क्रिकेटचा धडाका सुरू होत आहे. इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात

ICC Champions Trophy: English opener against Bangladesh | ICC Champions Trophy : इंग्लंडची बांगला देशविरुद्ध सलामी

ICC Champions Trophy : इंग्लंडची बांगला देशविरुद्ध सलामी

Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 31 - यजमान इंग्लंड आणि बांगला देश यांच्यातील सलामी लढतीने उद्या गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी वन डे क्रिकेटचा धडाका सुरू होत आहे. इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात सकाळच्या सत्रात चेंडू स्विंग होत असल्याने उभय संघांसाठी फलंदाजीतील उणिवा दूर सारण्याचे अवघड आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजेपासून लढतीचा थरार अनुभवता येणार आहे.
इंग्लंडमधील हवामान क्रिकेटपटूंसाठी किती आव्हानात्मक असते याची झलक सोमवारी पहायला मिळाली. इंग्लंडने  द. आफ्रिकेविरुद्ध तिस-या वन डेत अवघ्या २० धावांत सहा गडी गमवले. वन डे क्रिकेटमधील त्यांची ही सर्वांत मोठी दैना आहे. कासिगो रबाडा आणि वेन पार्नेल यांनी इंग्लंडची दाणादाण उडविली होती. अधिक पाटा खेळपट्ट्यांवर ढगाळ वातावरणात कशी फलंदाजी करायची हे यजमान संघालादेखील कळले नव्हते.
काल बांगला देशची भारताविरुद्ध सराव सामन्यात अशीच घसरगुंडी झाली. सध्याचा विजेता भारताने ३२४ धावा उभारल्या पण बांगला देश संघ ८४ धावांत गारद झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूर्वसंध्येला तब्बल २४० धावांनी झालेला पराभव बांगला देशचे मनोबळ खच्ची करणारा आहे. 
या सामन्यासाठी ११ खेळाडूंची निवड करणे इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरली आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स आणि ख्रिस व्होक्स पूर्णत: फिट झाल्यामुळे अखेरच्या वन डेत अर्धशतक ठोकणा-या जॉनी बेयरेस्टॉ याला राखीव बाकावर बसावे लागू शकते. कोच ट्रॅव्हर बेलिस म्हणाले,‘संघाने बचावात्मक पवित्रा घेत विश्व दर्जाची स्पर्धा जिंकताना मी कुठल्याही संघाला पाहिलेले नाही. साहसाच्या बळावरच मोठी स्पर्धा जिंकता येते.’
या सामन्यात इंग्लंड आणि बांगला देश यांच्या चिंतेचे कारण एकसारखे आहे. दोन्ही संघांना फलंदाजांकडून अपेक्षा असतील. भारताविरुद्ध सर्वाधिक २४ धावा काढणारा मेहदी हसन याला मात्र आमचा संघ इंग्लंडला पाणी पाजू शकतो असा विश्वास आहे. पहिल्या सामन्यासाठी चांगली तयारी झाली आहे. आम्ही इंग्लंडविरुद्ध अनेकदा चमकदार कामगिरी केली. उद्या विजयाचा विश्वास वाटतो, असे तो म्हणाला.
२०१५ च्या विश्वचषकात बांगला देशने इंग्लंडला नमविले होते. त्यावेळचे बरेचसे खेळाडू या सामन्यात देखील दिसतील. अ‍ॅडिलेड ओव्हलवरील त्या सामन्यात महमदुल्लाहने बांगला देशकडून शतक झळकविले होते. पण आज पुन्हा नव्याने सुरुवात होणाार असल्याने आम्ही चांगल्या सुरुवातीवर लक्ष केंद्रित केल्याचे कोच हतुरासिंघेयांनी सांगितले.

Web Title: ICC Champions Trophy: English opener against Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.