ICC Champions Trophy : महान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ भारतीय गोलंदाजीने प्रभावित
By admin | Published: June 1, 2017 02:48 PM2017-06-01T14:48:06+5:302017-06-01T14:48:06+5:30
अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन अव्वल फलंदाजांच्या नाकीनऊ आणणारा ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ भारतीय गोलंदाजीने प्रभावित झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 1 - अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन अव्वल फलंदाजांच्या नाकीनऊ आणणारा ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ भारतीय गोलंदाजीने प्रभावित झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणा-या भारतीय गोलंदाजांच्या चमूचे मॅग्राथने कौतुक केले आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीमुळे भारतीय टीम अन्य संघांपेक्षा वरचढ ठरेल असे मत मॅग्राथने व्यक्त केले. 47 वर्षीय मॅग्राथ सध्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी आला आहे.
दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारानेही भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक असल्याचे म्हटले होते. मागच्या दोन-तीन वर्षात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. भारताची गोलंदाजीची बाजू सशक्त आहे. वेगवान आणि फिरकी मा-यामुळे भारतीय संघ जास्त वरचढ ठरेल असे मॅग्राथने म्हटले आहे.
रविवारी पारंपारिक पाकिस्तान विरुद्ध होणा-या पहिल्या सामन्यात भारताला विजयाची संधी जास्त असल्याचे त्याने म्हटले आहे. भारत-पाकिस्तान मॅच नेहमीच मोठी असते. पाकिस्तानकडेही चांगले दर्जेदार गोलंदाज आणि अनुभवी फलंदाज आहेत. तुम्ही सांगू शकत नाही पण पाकिस्तानही आश्चर्यकारक निकालाची नोंद करु शकतो असे मॅग्राथने म्हटले आहे.
भारतीय संघ उपांत्यफेरीत पोहोचेल. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या तीन टीम्स सेमीफायनल खेळतील असा अंदाज मॅग्राथने वर्तवला असून, चौथा संघ न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिका असेल. मॅग्राथला जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या दोन गोलंदाजांनी जास्त प्रभावित केले आहे. बुमराह एकदिवसीय क्रिकेटसाठी चांगला गोलंदाज असून उमेशही चांगली गोलंदाजी करतोय.
खासकरुन हाणामारीच्या षटकांमध्ये दोघांची गोलंदाजी वाखाणण्याजोगी असते असे मॅग्राथने म्हटले आहे. गतविजेता भारतच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारताकडे जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केले होते. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा हे भारताचे फिरकी गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपयुक्त कामगिरी करत असून, कर्णधार विराट कोहली भले आयपीएलमध्ये अपयशी ठरला असेल पण इथे तो दमदार कामगिरी करेल असा संगकाराला विश्वास वाटतो.