महिला क्रिकेटचा समावेश करण्यास आयसीसी उत्सुक
By Admin | Published: July 4, 2016 05:47 AM2016-07-04T05:47:41+5:302016-07-04T05:47:41+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दक्षिण आफ्रिकेतील डरबनमध्ये २०२२मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यास उत्सुक
एडिनबर्ग : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दक्षिण आफ्रिकेतील डरबनमध्ये २०२२मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यास उत्सुक असून, त्यासाठी अर्ज करणार आहे. एडिनबर्गमध्ये आयसीसीच्या वार्षिक संमेलनामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पारंपरिक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे क्रिकेटचा प्रचार व प्रसार करण्यात अडचण भासते, असे आयसीसीचे मत आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश केल्यामुळे क्रिकेटचा प्रचार व प्रसार होण्यास मदत मिळेल, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष व सध्या आयसीसीचे चेअरमन असलेल्या शशांक मनोहर यांनी व्यक्त केले. महिला क्रिकेटपटूंसाठी हे मोठे व्यासपीठ असेल, असेही त्यांनी या वेळी सांगतिले. केवळ एकदा १९९८मध्ये मलेशियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यात दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाने जेतेपद पटकावले होते. याव्यतिरिक्त आयसीसी क्रिकेटचा आॅलिम्पिकमध्ये समावेश करण्याबाबत पर्याय शोधत आहे. आयसीसीने म्हटले की, वर्षाच्या अखेर आयओसीसोबत आॅलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत चर्चा होणार आहे.