आयसीसी चेअरमनपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार- मनोहर
By admin | Published: May 10, 2017 08:41 PM2017-05-10T20:41:37+5:302017-05-10T20:41:37+5:30
चेअरमनपदाचा कार्यकाळ ते पूर्ण करणार का, याबद्दलची अनिश्चितता आता संपुष्टात आलीआहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - जून 2018 पर्यंत मी पदावर कायम राहणार हे शशांक मनोहर यांनीच स्पष्ट केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या(आयसीसी) चेअरमनपदाचा कार्यकाळ ते पूर्ण करणार का, याबद्दलची अनिश्चितता आता संपुष्टात आली
आहे. आयसीसीचे स्वतंत्र चेअरमन म्हणून शशांक मनोहर हे जून 2018 पर्यंत पदावर कायम राहतील, असे बुधवारी आयसीसीच्यावतीने सांगण्यात आले.
मागच्या वर्षी मार्च महिन्यात मनोहर यांनी वैयक्तिक कारण पुढे करीत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तथापि आयसीसीच्या पूर्णकालीन तसेच सहयोगी सदस्यांनी त्यांना कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली होती. ईएसपीएन-क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार मनोहर यांनी आयसीसीत नव्या सुधारणा लागू करण्यास पुढाकार घेतला. या सुधारणा पूर्णपणे अमलात येईपर्यंत पदावर कायम राहण्याचा सदस्यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला होता. सुरुवातीला मनोहर हे यंदा जूनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक आमसभेपर्यंतच पदावर राहणार होते.
तथापि कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात आले आहे. मूळ नागपूरचे निष्णात वकील असलेले माजी बीसीसीआय अध्यक्ष अॅड. मनोहर यांनी आयसीसीत लाभांश वाटप तसेच कार्यसंचालनाचे नवे मॉडेल आणले आहे. सदस्यांनी त्यांच्या कार्याला भक्कम पाठिंबा दर्शविला. दुबईत आयसीसी बैठकीदरम्यान यावर मतदान घेण्यात आले तेव्हा बीसीसीआयला लाभांश मॉडेलवर 1-13 आणि संचालन मॉडेलवर 1-12 अशा मोठा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. लाभांश तसेच संचालन मॉडेलला केवळ बीसीसीआयने विरोध दर्शविला. त्यामुळे विश्व क्रिकेटमध्ये सध्या बीसीसीआय एकाकी पडले आहे. मनोहर यांच्यामुळेच जगातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयला आर्थिक नुकसान झाल्याचे बीसीसीआय अधिकाऱ्यांचे मत आहे. बीसीसीआय प्रशासकांच्या समितीनुसार (सीओए) बीसीसीआयच्या चिंतेचे मोठे कारण लाभांश मॉडेल नसून संचालन मॉडेल हेच आहे. दुसरीकडे मनोहर आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याने ईसीबी अध्यक्ष जाईल्स क्लार्क यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. जाईल्स हे आयसीसीचे स्वतंत्र चेअरमन बनण्यास इच्छुक होते.