आइसलॅँडने केले पोर्तुगालला थंड
By admin | Published: June 16, 2016 03:57 AM2016-06-16T03:57:42+5:302016-06-16T03:57:42+5:30
युरो चषक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या आइसलॅँडसारख्या नवख्या संघाने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील बलाढ्य पोर्तुगालला १-१ असे बरोबरीत रोखण्याची किमया केली.
सेंट एटियेने : युरो चषक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या आइसलॅँडसारख्या नवख्या संघाने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील बलाढ्य पोर्तुगालला १-१ असे बरोबरीत रोखण्याची किमया केली.
सामना सुरू होण्यापूर्वीच पोर्तुगालचा विजय निश्चित समजला जात असताना आइसलॅँडच्या कामगिरीने त्यांना मोठा धक्का बसला. नानीने केलेल्या सुंदर गोलमुळे पोर्तुगालने सुरुवातीस आघाडी घेतली. मात्र, आइसलॅँडच्या बिरकिर ब्यार्नासनने गोल करीत सामना बरोबरीत आणला. पोर्तुगालचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची कामगिरी निराशाजनक राहिली. या सामन्यात खेळून त्याने आपल्या देशाच्या लुईस फिगोच्या १२७ सामन्यांत खेळण्याच्या कामगिरीची बरोबरी केली.
सामन्याच्या ३१ मिनिटालाच पोतुर्गालच्या नानीने गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये ५० व्या मिनिटाला आइसलॅँडच्या बिरकिर जार्नसनने गोल करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला. सामन्यात बहुतांश वेळ चेंडू आइसलॅँडच्याच गोलक्षेत्रात होता. मात्र, पोर्तुगालला विजयी गोल करता आला नाही. सामन्याच्या पहिल्या हाफमध्येही पोर्तुगालचाच चेंडूवर ताबा होता. मात्र, आइसलॅँडच्या गोमेज, राफेल गुएरिरो या बचावपटूंनी गोल करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. रोनाल्डोची खराब कामगिरी व आइसलॅँडचा गोलरक्षक हॉलडोरोसनयच्या जबरदस्त बचावामुळे पोर्तुगालला यश मिळाले नाही. तसेच आइसलॅँडच्या बचावपटूंनी रोनाल्डो व नानीला रोखण्याची कामगिरी चोख पार पाडली. एल्फ्रेड फिनबोगासने शेवटच्या मिनिटात गोल करण्याचा केलेला प्रयत्नही त्यांनी हाणून
पाडला. (वृत्तसंस्था)