खेळाडूंसोबत दौरा करीत राहिलो तर पुढची सिंधू मिळणार नाही - गोपीचंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:25 AM2019-07-18T00:25:24+5:302019-07-18T00:25:57+5:30
गोपीचंद हे पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडूसोबतही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसले नाहीत.
नवी दिल्ली : ‘खेळाडूंसोबत मी सतत दौरा करीत राहिलो, तर भविष्यातील पिढीला सिंधू आणि सायना मिळणार नाही,’ असे राष्टÑीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी म्हटले आहे. भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना यंदा स्टेडियममध्ये गोपीचंद यांचे मार्गदर्शन मिळू शकले नाही.
गोपीचंद हे पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडूसोबतही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसले नाहीत. पुढील वर्षीही हेच धोरण कायम राहील, असे गोपीचंद यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘मी सतत प्रवास करीत राहिलो तर पुढील पिढी घडणार कशी? भविष्यातील खेळाडू घडले नाहीत तर पुढील सिंधू कशी मिळणार? यासाठी आम्हाला अधिक प्रशिक्षक हवे आहेत. मी एकटा काहीही करू शकत नाही. मला अधिक मदत आणि सहकार्य हवे आहे.’
आॅलिम्पिक पदक विजेती सिंधू आणि सायना तसेच श्रीकांतसह अनेक दिग्गज भारतीय खेळाडू गोपीचंद यांच्याच मार्गदर्शनात घडले. तथापि आता आघाडीच्या खेळाडूंसाठी गोपीचंद यांच्याकडे वेळच नाही. मागच्या महिन्यात सिंधू आणि गोपीचंद यांच्यातील संबंध आधीसारखे राहिले नसल्याचे वृत्त आले होते. पण दोघांनीही नंतर हे वृत्त खोडसाळ असल्याचे स्पष्ट केले होते.
गोपीचंद म्हणाले, ‘आपल्यावर कोचचे लक्ष असावे असे प्रत्येकाला वाटते. कोर्टवर मी अधिक वेळ घालवावा, असेही अनेकांना वाटते. मला संदेश मिळतात. आपण सोबत असता तर मी अमूक स्पर्धा जिंकले असते किंवा असतो, असा खेळाडूंकडून आग्रह होतो. अशावेळी एखाद्या खेळाडूवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.’
२००८-०९ पासून प्रत्येकवर्षी राष्टÑकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा
किंवा आॅलिम्पिकसाठी मी संघासोबत जातो. अन्य कुठल्याही स्पर्धांसाठी जात नाही. यंदा देखील हाच पायंडा कायम राहणार. २०२० च्या आॅलिम्पिकसाठी मात्र संघोसोबत जाणार आहे.’ (वृत्तसंस्था)