तर पंच दाखवतील खेळाडूंना बाहेरचा रस्ता!
By admin | Published: March 7, 2017 09:07 PM2017-03-07T21:07:53+5:302017-03-07T21:07:53+5:30
क्रिकेटपटूंची मैदानावरील वागणूक खेळाच्या हिताची नाही, असे पंचांना लक्षात येताच ते खेळाडूंना थेट मैदानाबाहेर घालवू शकतील
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 7 : क्रिकेटपटूंची मैदानावरील वागणूक खेळाच्या हिताची नाही, असे पंचांना लक्षात येताच ते खेळाडूंना थेट मैदानाबाहेर घालवू शकतील. पंचांना हा अधिकार येत्या १ आॅक्टोबरपासून मिळणार आहे. एमसीसीने बॅटच्या आकारासंदर्भातदेखील नियम निश्चित केले असून धावबादच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. या अंतर्गत फलंदाज धाव घेत असताना क्रिजमध्ये पोहोचल्यावर त्याची बॅट किंवा शरीर हवेत असेल तरी तो बाद होणार नाही. गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या शिफारशीनुसार नवे नियम अंमलात येतील.
एमसीसीचे क्रिकेट प्रमुख जॉन स्टीफन्सन म्हणाले, ह्यखेळाडूंचे वर्तन सुधारणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या वागणुकीमुळे पंच खेळापासून दूर जात आहेत. एखाद्या खेळाडूला या प्रकरणी शिक्षा झाल्यास तो पुन्हा चूक करणार नाही शिवाय त्याचा शिस्त पाळण्याचा आत्मविश्वास वाढेल, अशी आशा करायला हरकत नाही धावबादबाबत एमसीसीचे मत असे की, फलंदाज धाव घेताना त्याची बॅट किंवा शरीर जमीनीवर नसेल पण क्रिजच्या आत असेल तर त्याला बाद देता येणार नाही.
नव्या संहितेनुसार शिक्षा अशी...
लेव्हल - १ : वारंवार अपील करणे किंवा पंचांच्या निर्णयावर नापसंती
दर्शविणे. याअंतर्गत आधी तंबी दिली जाईल. दुसऱ्यांदा चूक झाल्यास विरोधी
संघाला पाच धावा पेनल्टी स्वरूपात दिल्या जातील.
लेव्हल - २ : खेळाडूंच्या दिशेने चेंडू भिरकावणे आणि हेतुपुरस्सर विरोधी
खेळाडूंच्या शरीरसंपर्कात येणे. याअंतर्गत प्रतिस्पर्धी संघाला ताबडतोब
पाच पेनल्टी गुण दिले जातील.
लेव्हल - ३ : पंचांना धमकी, अन्य खेळाडू, टीम अधिकारी किंवा प्रेक्षकांना
जीवे मारण्याची धमकी देणे. याअंतर्गत विरोधी संघाला पाच पेनल्टी गुण दिले
जातील. दोषी खेळाडूला सामन्याच्या प्रकारानुसार काही षटकांसाठी
मैदानाबाहेर बसावे लागेल.
लेव्हल - ४ : पंचांना धमकी देणे किंवा हिंसक वर्तन करणे. याअंतर्गत
प्रतिस्पर्धी संघाला पाच पेनल्टी धावा दिल्या जातील, शिवाय दोषी खेळाडूला
सामन्यातून बाहेर केले जाईल. घटनेच्या वेळी खेळाडू फलंदाजी करीत असेल तर
त्याला रिटायर्ड आऊट मानले जाईल