फायदा होत असेल, तर स्लेजिंग करणारच!
By Admin | Published: February 15, 2017 12:40 AM2017-02-15T00:40:04+5:302017-02-15T00:40:04+5:30
माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्या मनाप्रमाणेच खेळ करेल. जर तो स्लेजिंग सारखे प्रकार करीत असेल आणि त्याचा फायदा संघाला होत असेल, तर
मुंबई : माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्या मनाप्रमाणेच खेळ करेल. जर तो स्लेजिंग सारखे प्रकार करीत असेल आणि त्याचा फायदा संघाला होत असेल, तर मी त्या खेळाडूला रोखणार नाही,’ असे स्पष्ट मत व्यक्त करताना आॅस्टे्रलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने भारतीय संघाला एकप्रकारे इशाराच दिला. विशेष म्हणजे, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचे शिलेदारही ‘जसास तसे’ उत्तर देण्यात तरबेज असल्याने या मालिकेत क्रिकेटप्रेमींना मोठी मेजवानी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.
क्रिकेटविश्वात स्लेजिंगद्वारे प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकर करण्यासाठी प्रसिध्द असलेले आॅस्टे्रलियन्स भारत दौऱ्यावरही आपल्या या रणनितीसह खेळणार असल्याचे स्मिथने बोलून दाखवले. दखल घेण्याची बाब म्हणजे, भारत - आॅस्टे्रलियादरम्यान स्लेजिंगचे अनेक किस्से क्रिकेटविश्वात प्रसिध्द असून यातील हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंड्स यांच्यातील ‘मंकीगेट’ प्रकरण सर्वाधिक गाजले होते.
भारत दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना स्मिथ म्हणाला की, ‘भारतात विजय मिळवणे संघातील खेळाडूंसाठी आयुष्यातील सर्वाधिक सुखद क्षण असेल. भारतात खेळणे अत्यंत आव्हानात्मक आहे. जर आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो, तर १०-२० वर्षांनी या यशाकडे आम्ही आयुष्यातील सर्वात सुखद क्षण म्हणून बघू. भारतात खेळण्याची ही शानदार संधी आहे. हा दौरा अत्यंत कठीण ठरेल आणि मी आव्हानाला सामोरे जाण्यास उत्सुक आहे,’ असेही स्मिथने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)
विराट कोहलीविरुद्ध आम्ही रणनिती आखली असून त्याबाबत सहाजिकच काही बोलणार नाही. तो जागतिक दर्जाचा खेळाडू असून चांगली फलंदाजी करीत आहे. त्याने मागील चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावले आहे. भारताचे अव्वल सहा फलंदाज खूप मजबूत असून त्यांना रोखण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी अपेक्षा आहे. - स्टिव्ह स्मिथ, कर्णधार - ऑस्ट्रेलिया
आमची तयारी चांगली झाली आहे. हा दौरा खूप रोमांचक होईल. भारतीय संघ खूप चांगला असून त्यांच्याकडे अनेक चांगले वेगवान व फिरकी गोलंदाज आहेत. त्यांनी स्वदेशामध्ये गेल्या २० कसोटींपैकी एकही कसोटी गमावलेली नाही आणि त्यांचा संघ खूप मजबूत असल्याची आम्हाला कल्पना आहे.
- डॅरेन लेहमन, प्रशिक्षक - ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाने २००४-०५ साली भारताला २-१ असे नमवल्यानंतर भारतीय भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. ब्रेबॉर्न स्टेडियमवर १६ - १८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तीनदिवसीय सराव सामन्याद्वारे आॅस्टे्रलिया संघ भारतीय दौऱ्याची सुरुवात करेल.
च्२०१२ साली इंग्लंडकडून घरच्या मैदानावर मालिका गमावल्यानंतर भारताने आपल्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. भारताने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध सहज वर्चस्व राखले.