‘आयआयटी अनुत्तीर्ण झाल्याने खेळाडू बनलो’

By admin | Published: September 1, 2016 04:51 AM2016-09-01T04:51:49+5:302016-09-01T04:51:49+5:30

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंच्या यशात मोलाचा वाटा असणारे मार्गदर्शक आणि भारतीय संघाचे राष्ट्रीय कोच पुल्लेला गोपीचंद कारकिर्दीत यशस्वी खेळाडूदेखील होते.

'IIT became player due to IIT failure' | ‘आयआयटी अनुत्तीर्ण झाल्याने खेळाडू बनलो’

‘आयआयटी अनुत्तीर्ण झाल्याने खेळाडू बनलो’

Next

नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंच्या यशात मोलाचा वाटा असणारे मार्गदर्शक आणि भारतीय संघाचे राष्ट्रीय कोच पुल्लेला गोपीचंद कारकिर्दीत यशस्वी खेळाडूदेखील होते. आयआयटी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचा यशस्वी खेळाडू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता, हे गुपित खुद्द गोपीचंद यांनीच आज चाहत्यांपुढे उघड केले.
क्रीडा विषयावरील चर्चेत सहभागी झालेले गोपीचंद म्हणाले, ‘‘मी आणि माझा भाऊ खेळात सहभागी व्हायचो. तो खेळात निपुण होता. मी अभ्यासात चांगला नाही, याचे मलादेखील चांगले वाटत होते. माझा भाऊ राज्य चॅम्पियन होता. त्याने आयआयटी परीक्षा दिली आणि उत्तीर्णदेखील झाला. आयआयटीला शिकायला गेल्यामुळे त्याला खेळ सोडावा लागला. मी इंजिनिअरिंगची परीक्षा दिली व त्यात अनुत्तीर्ण झालो. मी खेळणे सुरूच ठेवले. त्याचा परिणाम आज तुमच्यापुढे आहे. खेळात एकाग्रता असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय भाग्यदेखील तुमच्यासोबत असायला हवे.’’
गोपीचंद हे २००१मध्ये आॅल इंग्लंड चॅम्पियन बनलेले प्रकाश पादुकोण यांच्यानंतर दुसरे भारतीय खेळाडू आहेत. गोपीचंद यांनी नंतर निवृत्ती घेऊन अकादमी स्थापण्याचा निर्णय घेतला. अकादमी सुरू करण्याचा मार्ग सोपा नव्हता, असे सांगून गोपी म्हणाले, ‘‘काही वर्षांआधी मी सार्वजनिक क्षेत्रातील एका कंपनीकडे मदतीचा हात मागितला होता. मला सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० असे तीन दिवस ताटकळत ठेवण्यात आले होते. तीन दिवसांनंतर कंपनीचा एक मोठा अधिकारी माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘बॅडमिंटनमध्ये वैश्विक खेळ बनण्याची मुळीच क्षमता नाही.’ प्रायोजकपद मागण्यासाठी कुणाकडे जाण्याची ती अंतिम वेळ होती. त्याच दिवशी मी आई-वडील तसेच पत्नीशी सल्लामसलत केली. आम्ही आमचे राहते घर गहाण ठेवले आणि नंतर अकादमीला मूर्त स्वरूप दिले.’’
हैदराबादमध्ये अकादमी स्थापन केल्याच्या १२ वर्षांत गोपीचंद यांनी देशाला आॅलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून दिली आहेत. याबाबत ते म्हणाले, ‘‘मी २५ युवा मुलांसोबत २००४मध्ये अकादमीची मुहूर्तमेढ रोवली. सिंधू ही त्या वेळी ८ वर्षांची, अर्थात सर्वांत कमी वयाची खेळाडू होती. १५ वर्षांचा कश्यप सर्वांत मोठा खेळाडू होता. भारत एक दिवस आॅलिम्पिकचा मानकरी ठरावा, हेच स्वप्न उराशी होते. २०१२मध्येच माझी स्वप्नपूर्ती होईल, असे मात्र वाटले नव्हते.’’ हास्यविनोदात रमलेले गोपीचंद पुढे म्हणाले, ‘‘माझ्या मते, आता मला निवृत्त व्हायला हवे, कारण माझे सर्वच लक्ष्य पूर्ण झाले आहे.’’
काही लोकांनी आपल्यासोबत फारच असभ्य वर्तन केल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘पण, त्याही वेळी जे पाठीशी उभे राहिले, त्यांचा मी आभारी आहे.’’ (वृत्तसंस्था)
०००

 

Web Title: 'IIT became player due to IIT failure'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.