ऑलिम्पिक पुन्हा स्थगित करणे अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 02:19 AM2020-04-24T02:19:51+5:302020-04-24T02:20:02+5:30
आधीच वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेले ऑलिम्पिक आयोजन २३ जुलै २०२१ च्या पुढे वाढविणे अशक्य असल्याचे त्यांचे मत आहे.
टोकियो : टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी कोरोनामुळे पुन्हा एकदा आयोजन स्थगित करणे जवळपास अशक्य असल्याचे गुरुवारी सांगितले. आधीच वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेले ऑलिम्पिक आयोजन २३ जुलै २०२१ च्या पुढे वाढविणे अशक्य असल्याचे त्यांचे मत आहे.
मोरी म्हणाले, ‘क्रीडा व्यवस्थापन, खेळाडू आणि आयोजनाशी जुळलेल्या अन्य सर्व बाबींचा विचार व्हायला हवा. दोन वर्षांसाठी आॅलिम्पिक लांबणीवर टाकणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. आॅलिम्पिक आयोजन दोन वर्षांसाठी लांबणीवर टाकायचे का, अशी विचारणा मी याआधीच पंतप्रधान शिंजो आबे यांच्याकडे केली होती, मात्र त्यांनीही केवळ वर्षभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.’
कोरोना व्हायरसवर मानवाने मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून टोकियो आॅलिम्पिककडे पाहिले जाईल. तथापि वर्षभरानंतर खरोखर आॅलिम्पिकचे आयोजन होऊ शकेल का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. कोबे विद्यापीठाच्या संक्रमण रोगाचे प्राध्यापक केतारो इवाता यांनी याच आठवड्यात कोरोना व्हायरसवर विजय मिळविणे कठीण होत चालल्याची चिंता व्यक्त करीत प्रामाणिकपणे बोलायचे तर टोकियो आॅलिम्पिक पुढील वर्षीदेखील होऊ शकेल का, याबद्दल माझ्या मनात शंका असल्याचे वक्तव्य केले होते. (वृत्तसंस्था)
कोरोनामुळे समस्येत पडली भर
आयोजकांसाठी कोरोनाचा प्रकोप सतत अडसर ठरत आहे. स्पर्धा वर्षभर लांबणीवर पडल्यानंतरही कोरोनामुळे आयोजनात व्यत्यय येत आहे. स्टाफमधील एक सदस्य बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या सदस्याला क्वारंटाइन करण्यात आले आहे. हारुमी नावाची ही व्यक्ती टोकियो आॅलिम्पिकच्या मुख्यालयात कार्यरत होती. तिच्यासोबत जितके जण कामावर होते त्या सर्वांना घरीच सुरक्षित राहण्यास सांगण्यात आले. समितीत जवळपास ३५०० कर्मचारी काम करीत असून त्यापैकी ९० टक्केलोकांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.
लस नाही तर आॅलिम्पिक नाही...
जागतिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत कोविड-१९ वर लस तयार होत नाही तोपर्यंत टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन होणे शक्य नाही. आॅलिम्पिकचे आयोजन २०२१ ला व्हायचे असेल तर त्याआधी लसचा शोध लागणे आवश्यक असल्याचे मत प्रा. देवी श्रीधर यांनी व्यक्त केले. लसचा शोध लवकरच लागेल, असा आशावाद व्यक्त करीत बीबीसीशी बोलताना श्रीधर पुढे म्हणाले, ‘लस शोधणे शक्य असल्याचे तज्ज्ञांकडून आम्ही ऐकले आहे. यासाठी वर्ष-दीड वर्ष लागेल, असा माझा अंदाज होता, तथापि लसचा शोध लवकर लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत टीकाकरण करू शकलो तर आॅलिम्पिकचे आयोजन होईलच.’ ही लस प्रभावी ठरेल आणि स्वस्त दरात उपलब्ध झाल्यास आपण त्याला ‘गेम चेंजर’ म्हणू शकू. तज्ज्ञांना यश न आल्यास आॅलिम्पिकचे आयोजन कठीण होईल, असे मत श्रीधर यांनी मांडले.