स्वप्ना बर्मनची बक्षीस रक्कम वाढवा; बॉक्सर विजेंदरची ममता बॅनर्जी यांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 09:38 AM2018-09-05T09:38:54+5:302018-09-05T09:39:34+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. जकार्ता येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण ६९ पदकांची कमाई करून आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
नवी दिल्ली: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. जकार्ता येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण ६९ पदकांची कमाई करून आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. या पदकांमध्ये १५ सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील प्रत्येक पदकविजेत्या खेळाडूने भारतीयांची मने जिंकली. यातीलच एक नाव आहे ते स्वप्ना बर्मन...
हेप्टाथ्लॉन या शारीरिक कसोटी पाहणाऱ्या खेळात स्वप्नाने भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. अत्यंत गरीब कुटूंबातील या खेळाडूने इतिहास घडवला. आशियाई स्पर्धेत हेप्टाथ्लॉनमध्ये सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. पश्चिम बंगालमधील घोश्पारा येथे लहानाची मोठी झालेल्या स्वप्नाचे वडील रिक्षा वाहक होते आणि अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळून आहेत. तिची आई चहाच्या मळ्यात काम करते.
मात्र या पदकानंतर स्वप्नाच्या आयुष्यात बदल घडत आहेत. तिच्या घराशेजारी पक्का रस्ता बांधण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिला त्वरित १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याशिवाय तिला सरकारी नोकरीही देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तिला जाणाऱ्या बक्षीस रक्कम वाढवावी अशी विनंती ऑलिम्पिक बॉक्सर विजेंदर सिंग याने केली आहे.
त्याने ट्विट केले की,' माननीय ममता बॅनर्जी स्वप्ना बर्मनला देण्यात यणाऱ्या बक्षीस रकमेत वाढ करावी ही विनंती. ' यावेळी त्याने अन्य राज्यांनी पदकविजेत्या खेळाडूंना जाहीर केलेल्या बक्षीस रकमेचा दाखला दिला.
Dear @MamataOfficial didi plz increase #SwapnaBarman state price money 🙏🏽 #10lakhvs3crore#HumbleRequest#IndiaatAsiangames2018
— Vijender Singh (@boxervijender) September 3, 2018
केंद्रीय मंत्री एस एस अहलुवालिया यांनी स्वप्नाच्या घरी भेट देत ३० लाखांचे बक्षीस जाहीर केले.