केडेन्स संघाचे सर्वाधिक गुणांसह निर्विवाद वर्चस्व
By admin | Published: June 19, 2015 02:09 AM2015-06-19T02:09:42+5:302015-06-19T02:09:42+5:30
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील सुपर लीग स्पर्धेत केडन्स संघाने १७ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले.
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील सुपर लीग स्पर्धेत केडन्स संघाने १७ गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले. इतर सामन्यांत कोल्हापूरने साहिल शिबेच्या (नाबाद ६०) फलंदाजीच्या बळावर सिंधुदुर्ग संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात डिव्हीसीए संघाने मिझान सय्यद व उत्कर्ष अगरवाल यांच्या अर्धशतकी खेळी व मनोज यादव (५ बळी) याच्या भेदक गोलंदाजीने जळगाव संघाचा पराभव केला.
केडन्सने एमसीए प्रेसिडेंट इलेव्हन संघावर पहिल्या डावातील आघाडीवर मात करीत विजेतेपदावर नाव कोरले. दरम्यान इतर सामन्यांत सिंधुदुर्गने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. आदित्य खानविलकर व करण संगावकर यांच्या भेदक माऱ्यासमोर सिंधुदुर्गचा डाव ३३.३ षटकांत १२० धावांतच गडगडला.
कोल्हापूरने ३४ षटकांत ६ बाद १२६ धावा केल्या. साहिल शिबेने ६० धावांची नाबाद खेळी केली. तर सिद्धार्थ कोठारीने ३३ धावांसह त्याला सुरेख साथ दिली. ओवेस शहा व वितेश टेंबुलकर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
अन्य सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या जळगावला डीव्हीसीए संघाने ३०.२ षटकांत ९० धावांतच गुंडाळले. मनोज यादव याने ३८ धावांच्या मोबदल्यात निम्मा संघ तंबुत धाडला. यानंतर डीव्हीसीएने ५३.४ षटकांत १९२ धावांची खेळी केली. मिझान सय्यद (६०), उत्कर्ष अगरवाल (५२) व ओम भोसले (३१) यांनी डीव्हीसीएचा विजय निश्चित केला.