भारतासमोर मालिका विजयाचे लक्ष्य

By Admin | Published: January 19, 2017 12:52 AM2017-01-19T00:52:55+5:302017-01-19T00:52:55+5:30

इंग्लंडविरुद्ध आज येथे होणारा मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने ‘विराट’सेना उतरणार आहे

India aim to win series against India | भारतासमोर मालिका विजयाचे लक्ष्य

भारतासमोर मालिका विजयाचे लक्ष्य

googlenewsNext


कटक : कठीण लक्ष्याचा पाठलाग करीत विजय नोंदविणाऱ्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावताच इंग्लंडविरुद्ध आज येथे होणारा मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने ‘विराट’सेना उतरणार आहे.
धावांचा पाठलाग करण्यात पटाईत असलेल्या विराटने पुण्यात स्वत: मोर्चा सांभाळून ३०० हून अधिक धावांचे आव्हान सर करीत भारताला चमत्कारिक विजय मिळवून दिला होता. कोहलीने १७ वे शतक ठोकले तर विजयाचा नायक ठरलेल्या केदार जाधव याने ६५ चेंडूत शतकी खेळी केली होती. तीनदा ३५० वर धावांचा पाठलाग करीत विजय नोंदविणारा भारत एकमेव संघ आहे. या तिन्ही विजयात विराटने शतक ठोकले हे देखील विशेष.
जाधवमुळे आश्चर्यचकित झालेला प्रतिस्पर्धी कर्णधार इयोन मॉर्गन म्हणाला, ‘आम्ही विराटविरुद्ध डावपेच आखले होते. जाधवच्या खेळीची जाणीव नव्हतीच. त्याने आमचा विजय हिरावून घेतला.’ बाराबती स्टेडियम भारतासाठी लकी ठरले. येथे १५ पैकी ११ वन डे भारताने जिंकले. येथे युवराजच्या कामगिरीवर नजर असेल. तो ३०० वन डे पासून केवळ सहा सामने दूर आहे. पहिल्या सामन्यात भारताची गोलंदाजी साधारण झाती. दरम्यान अमित मिश्राला संधी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. (वृत्तसंस्था)
>इंग्लंडवरही विजय मिळविण्याचे दडपण आहे. त्यासाठी गोलंदाजीत सुधारणा घडवून आणण्याचे आव्हान कर्णधारापुढे असेल. ख्रिस व्होक्स आणि डेव्हिड व्हिले यांना सुरुवातीला बळी मिळाले पण नंतर सर्वच गोलंदाज निष्प्रभावी ठरले. बेन स्टोक्सने ७३ धावा मोजल्या होत्या.बाराबती स्टेडियमवर मागचा वन डे २ नोव्हेंबर २०१४ ला खेळला गेला. भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३६३ धावा ठोकल्यानंतर लंकेवर १६९ धावांनी विजय साजरा केला. ४ आॅक्टोबर २०१५ ला याच मैदानावर भारताने टी-२० सामना खेळला. त्यात भारत ९२ धावांत बाद होताच सहा गड्यांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. नाराज प्रेक्षकांनी मैदानात कागदी रॉकेट भिरकावल्यामुळे खेळ खोळंबला. यंदा सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
या रेकॉडर््सवर असणार नजर...
१०६ धावांची खेळी केल्यास माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय सामन्यात ख्रिस गेलच्या ९,२२१ धावांचा विक्रम मागे टाकेल. असे केल्यास जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी १६व्या स्थानी येईल.
आणखी एक शतक ठोकल्यास कर्णधार विराट कोहली श्रीलंकेचा माजी धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्याच्या २८ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करेल. शिवाय, कोहली सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानी येईल.चार षटकार ठोकल्यास महेंद्रसिंग धोनी ब्रेंडन मॅक्क्युलमच्या २०० षटकार ठोकण्याचा विक्रम मोडून सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी येईल.
पुनरागम करणाऱ्या युवराजला १५० षटकारांचा विक्रम करण्यासाठी एका षटकाराची गरज आहे.
अष्टपैलू रवींद्र जडेजाला १५० बळी पूर्ण करण्यासाठी २ बळींची गरज.
धावांचा पाठलाग करताना पुन्हा शतक ठोकण्यात कोहली यशस्वी झाला तर तो सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडू शकतो. कोहली व सचिनने धावांचा पाठलाग करताना प्रत्येकी १७ शतक झळकावली आहेत.
>उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, जयंत यादव, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्रा.
इंग्लंड : इयोन मोर्गन(कर्णधार), जेसन राय, अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रुट, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस व्होक्स, डेव्हिड व्हिले, आदील रशीद, जॅक बॉल, लियाम डॉसन, जॉनी बेयरस्टॉ, सॅम बिलिंग्स, लियॉम प्लंकेट.

Web Title: India aim to win series against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.