भारत अन् विराटला नंबर वन बनण्याची संधी
By admin | Published: January 15, 2015 04:17 AM2015-01-15T04:17:29+5:302015-01-15T04:17:29+5:30
विश्व चॅम्पियन टीम इंडिया आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्याकडे आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेत आयसीसी मानांकनात नंबर वन बनण्याची संधी आहे़
नवी दिल्ली : विश्व चॅम्पियन टीम इंडिया आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्याकडे आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेत आयसीसी मानांकनात नंबर वन बनण्याची संधी आहे़ या मालिकेस १६ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे़ दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यातही १६ जानेवारीपासून ५ वन-डे सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे़
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या वन-डे क्रमवारीत आॅस्ट्रेलिया अव्वल, तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहेत़ यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो़ आॅस्ट्रेलिया आणि भारताचे प्रत्येकी ११७ गुण आहेत; मात्र कांगारू संघ दशांश गुणाने पुढे आहे़ आफ्रिकेच्या खात्यात ११२ गुण जमा आहेत़
ताज्या फलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स ८८७ गुणांसह नंबर वन आहे़ त्यानंतर कोहली ८६२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे़ या दोन्ही खेळाडूंमध्ये २७ गुणांची तफावत आहे़ शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या वन-डे मालिकेत दोन्ही खेळाडू एकमेकांना पछाडण्यासाठी प्रयत्नशील असेल़
भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या या मालिकेचा अंतिम सामना १ फेब्रुवारी रोजी होणार आहे़ या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली, तर भारत रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेऊ शकतो़ दरम्यान, या स्पर्धेत इंग्लंड पाचव्या क्रमांकावर आहे़ हा देशसुद्धा भारत आणि आॅस्ट्रेलियाच्या अव्वल क्रमांकाच्या मार्गात अडथळा ठरू शकतो़ विशेष म्हणजे, वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप केले, तर आफ्रिका संघही अव्वल क्रमांकावर झेप घेऊ शकतो़
(वृत्तसंस्था)