श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

By admin | Published: February 2, 2016 03:23 AM2016-02-02T03:23:00+5:302016-02-02T03:23:00+5:30

उपकर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या या मालिकेसाठी निवड समितीने अष्टपैलू पवन

India announces Sri Lanka series | श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

Next

नवी दिल्ली : उपकर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या या मालिकेसाठी निवड समितीने अष्टपैलू पवन नेगीचा संघात समावेश केला आहे.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-२० मालिकेत कोहलीने शानदार कामगिरी करताना तीन अर्धशतके झळकावित १९९ च्या सरासरीने १९९ धावा फटकावल्या. कोहलीने आॅक्टोबर ते जानेवारी या कालावधीत १० वन-डे आणि पाच टी-२० याव्यतिरिक्त चार कसोटी सामने खेळले.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी वन-डे सामन्यात नाबाद शतकी खेळी करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मनीष पांडेला १५ सदस्यांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. निवड समितीने ऋषी धवन, गुरकिरत मान आणि उमेश यादव
यांना वगळण्याचा निर्णय घेतला
आहे. या खेळाडूंची आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी निराशाजनक ठरली होती. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे संघात पुनरागमन झाले आहे.
भुवनेश्वर कुमार वन-डे मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला टी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळता आले नव्हते. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध ९ फेब्रुवारी रोजी पुणे येथे पहिली लढत खेळणार आहे. त्यानंतर अन्य दोन सामने १२ फेब्रुवारी रोजी रांची आणि १४ फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथे होतील.
निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी महिला संघ जाहीर केला. महिला संघाचे नेतृत्व मिताली राज करणार आहे. महिला संघाने टी-२० मालिकेत तीनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाचा पराभव करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुरुष संघांच्या मालिकेसोबतच महिला संघांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला संघाचे वन-डे सामने रांची येथे १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होतील, तर तीन सामन्यांची टी-२० मालिका २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत खेळली जाणार आहे. (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलियाला क्लीन स्वीप दिलेल्या प्रस्थापित संघामध्ये निवड होणे ही आश्चर्याची बाब आहे. जेव्हा मला निवडीबाबत समजले तेव्हा विश्वास बसला नाही. कारण सध्याचा संघ अव्वल संघ आहे. या निवडीचा मी पूर्ण फायदा घेवून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.- पवन नेगी
टी-२० (पुरुष) : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, पवन नेगी.
टी-२० (महिला) : मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, हरमनप्रीत कौर, अनुजा पाटील, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, सुषमा वर्मा, पूनम यादव, व्ही. आर. वनिता, स्नेह राणा, थिरूशकामिनी एमडी, एकता बिश्त, निरंजना नागराजन.
वन-डे संघ (महिला) : मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, हरमनप्रीत कौर, थिरूशकामिनी एमडी, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, सुषमा वर्मा, पूनम यादव, दीप्ती शर्मा, पूनम राऊत, आर. कल्पना, निरंजना नागराजन, प्रीती बोस.

Web Title: India announces Sri Lanka series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.