भारताचं अपील आता काही कामाचं नाही; विनेश फोगाट अपात्रतेवर UWW ची धक्कादायक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:18 PM2024-08-07T23:18:40+5:302024-08-07T23:20:21+5:30
Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगाटला ५० किलो वजनी गटात अधिक वजन भरल्यानं अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये निराशा पसरली.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानंतर भारतीय कुस्ती संघाने यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंगकडे (UWW) विनेशला थोडा वेळ दिला जावा अशी मागणी केली होती. मात्र आता UWW चे अध्यक्ष यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारतानं अपील केले तरी विनेश फोगाटवरील अपात्रता कारवाई मागे घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
भारतीय कुस्ती संघाने केली होती अपील
विनेश फोगाटचं वजन फायनल मॅचपूर्वी १०० ग्रॅम अधिक आढळलं ज्यामुळे विनेशला स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आले. याबाबत भारतीय कुस्ती संघाकडून अपील करण्यात आलं होतं. विनेशला आणखी थोडा वेळ आणि सूट दिली जावी असं भारताने म्हटलं. तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA ने विनेश रात्रभर तिचं वजन नियंत्रित करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत होती परंतु सकाळी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक असल्याचं निदर्शनास आले.
आता अपील काही कामाचं नाही
आता यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंगचे अध्यक्ष नेनाद लालोविच यांनी स्पष्ट केले की, भारताकडून आलेली अपील आता काही कामाची नाही. मला भारताच्या अपीलाची अडचण नाही. परंतु त्याचा परिणाम काय असेल हे ठाऊक आहे. या प्रकरणात काही होऊ शकते असं मला वाटत नाही. हे स्पर्धेचे नियम आहेत आणि नियम बदलले जाऊ शकतात असं मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत नियम काही कारणास्तव बनवले गेलेत, त्याचा सन्मान केला पाहिजे. मला विनेशबाबत अतिशय वाईट वाटतंय कारण तिचं वजन खूप कमी अंतराने अधिक असल्याचं दिसलं. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेबाबत सर्वांना माहिती आहे. याठिकाणी जगभरातील खेळाडू आलेले आहेत. अशा स्थितीत खेळाडूला योग्य वजन नसल्याने कुस्ती खेळण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही असं लालोविच यांनी पॅरिसमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
सिल्वर मेडल मिळणार नाही...
जेव्हा पत्रकारांनी UWW अध्यक्ष नेनाद लालोविच यांना विचारलं की, विनेश फोगाटला सिल्वर मेडल मिळणं तरी शक्य आहे का? यावर ते म्हणाले, विनेशला सिल्वर मेडल देणे शक्य नाही कारण स्पर्धेचा संपूर्ण रचना बदलली आहे. हे सर्व नियमांनुसार होत आहे. जे खेळाडू पुढे लढणार आहेत, त्यांना स्पर्धेपूर्वी वजनाच्या प्रक्रियेतून जावे लागेल हे ते सर्वांना माहित आहे असं त्यांनी स्पष्ट केले.