भारत-आॅस्ट्रेलिया ‘दंगल’ आजपासून

By admin | Published: February 23, 2017 01:19 AM2017-02-23T01:19:52+5:302017-02-23T01:20:03+5:30

तब्बल १९ सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केलेली टीम इंडिया व १२ वर्षांपासून भारतात विजयाच्या प्रतिक्षेत

India-Australia 'Dangla' from today | भारत-आॅस्ट्रेलिया ‘दंगल’ आजपासून

भारत-आॅस्ट्रेलिया ‘दंगल’ आजपासून

Next

पुणे : तब्बल १९ सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केलेली टीम इंडिया व १२ वर्षांपासून भारतात विजयाच्या प्रतिक्षेत असलेला आॅस्ट्रेलिया संघ यांच्यात गुरूवारपासून ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. यातील पहिली ‘दंगल’ पुण्याजवळ गहुंजे येथे असेलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर रंगणार आहे. पुण्यात होणारी ही पहिलीच कसोटी आहे. ही लढत जिंकून विजयी मालिका कायम राखण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे भारताच्या भूमीवर तब्बल एक तपानंतर विजयी पताका फडकवण्यासाठी कांगारू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
कर्णधार विराट कोहलीचा संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या संघाने अलीकडे बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या संघांना पाणी पाजले आहे. २०१५ पासून भारताने सलग ६ मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. ही मालिका जिंकून सातवी मालिकाही खिशात घालण्यासाठी हा संघ उत्सुक आहे. कोहलीसह भारताचे अनेक फलंदाज फॉर्मात आहेत. शिवाय गोलंदाजदेखील सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहेत. यामुळे, या मालिकेत भारताचे पारडे जड भासत आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या मालिकेतील पहिली लढत जिंकून विजयी प्रारंभ करण्याच्या इराद्याने टीम इंडिया गुरूवारी एमसीए मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे, आॅस्ट्रेलियाचा संघ आक्रमक खेळाच्या जोरावर भारताचा विजयरथ रोखण्यास प्रयत्नशील आहे. या संघाने पाकिस्तानविरूद्धच्या तिन्ही कसोटी जिंकल्या आहेत. त्यापूर्वी मात्र, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरूद्धच्या मालिकांमध्ये हा संघ मोठ्या फरकाने पराभूत झाला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर यांचा अपवाद वगळता या संघात स्टार फलंदाज नाहीत. त्यामुळे हा संघ रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकी माऱ्याला कसा सामोरा जातो, यावर मालिकेचा निकाल अवलंबून असेल.
डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात. फिरकीची बाजू नाथन लियॉन आणि स्टिव्ह ओकेफ सांभाळणार आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)

15 विजय मागील १९ कसोटींत भारताने मिळविले आहेत. उर्वरित ४ सामने अनिर्णीत सुटले. यातील ६ विजय २०० पेक्षा जास्त धावांच्या फरकाने, तर ३ विजय डावाने मिळविले.

06 पराभव आॅस्ट्रेलियाने मागील १९ कसोटींत स्वीकारले आहेत.
११ वेळा हा संघ विजयी ठरला, तर उर्वरित २ लढती ड्रॉ झाल्या.

20 सामन्यांत
घरच्या मैदानावर अपराजित राहण्याचा पराक्रम भारताने केलाय. २०१२-१३ पासून हा संघ मायदेशात २० कसोटी खेळला. त्यात १७ मध्ये हा संघ विजयी ठरला. उर्वरित ३ अनिर्णीत सुटल्या.

नेतृत्वाच्या मूल्यांकनाची ही वेळ नव्हे : विराट कोहली

पुणे : मागील काही मालिकांमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून भारताचा विराट कोहलीने कमालीचे यश मिळवले आहे. असे असले तरी, या यशाबाबत तो फारसा विचार करीत नाही. ‘‘माझ्या नेतृत्वाच्या मूल्यांकनाची ही योग्य वेळ नव्हे. खेळाडू आणि कर्णधार म्हणून प्रत्येक सामना जिंकण्याला माझी प्राथमिकता असते,’’ असे त्याने बुधवारी स्पष्ट केले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर गुरूवारपासून भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात पहिली कसोटी सुरू होत आहे. त्या पार्श्वभमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने मनमोकळा संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘संघ कसा कामगिरी करतो, यावर कर्णधाराचे यश अवलंबून असते. प्रत्येक मालिकेनंतर कर्णधार म्हणून कामगिरीचा आढावा मी घेत नसतो. त्यामुळे कर्णधार म्हणून मी किती यशस्वी ठरलो, हे आताच सांगू शकणार नाही. ६-७ वर्षांनंतर याबद्दल नेमकेपणाने सांगता येईल. अर्थात इतका काळ मी कर्णधारपदी राहिलो तरच हे शक्य आहे.’’
प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले आहे. माझ्यासह सर्वांनाच त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे. नियोजनबद्ध आक्रमणाची व्यूहरचना आखताना त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन कायम उपयोगी ठरते.
- विराट कोहली, कर्णधार, भारत

भारतीय संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. मात्र, आमचा संघ त्यांना तुल्यबळ लढत देण्यास सक्षम आहे. ही मालिका अटीतटीची होईल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क प्रभावी ठरू शकतो. भारतात दीर्घ काळापासून आम्ही जिंकलेलो नाही. ही कसोटी जिंकून मालिकेचा विजयी प्रारंभ करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू . - स्टीव्ह स्मिथ, कर्णधार, आॅस्ट्रेलिया


प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अभिनव मुकुंद, करुण नायर, हार्दिक पंड्या, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, वृद्धीमान साहा, इशांत शर्मा, मुरली विजय, जयंत यादव, कुलदीप यादव, उमेश यादव.
आॅस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅस्टॉन अ‍ॅगर, जोश हेजलवूड, उस्मान ख्वाजा, नॅथन लिआॅन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मॅथ्थू वॅड, जॅकसन बर्ड, पीटर हॅण्डसकोम्ब, स्टिव्ह ओकेफ, मॅट रेनशॉ, मिशेल स्वेपसन.

थेट प्रक्षेपण
सकाळी ९.३० पासून
स्थळ :
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे

Web Title: India-Australia 'Dangla' from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.