आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: कांस्य पदकाचा ‘थरथराट’; भारताने पाकला ४-३ असे नमवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 08:11 AM2021-12-23T08:11:13+5:302021-12-23T08:12:11+5:30
अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या या रोमांचक सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करीत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
ढाका : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना थरारकरीत्याच रंगतो आणि बुधवारी पुन्हा एकदा हाच थरार क्रीडाप्रेमींनी अनुभवला. अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या या रोमांचक सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-३ असा एका गोलने पराभव करीत पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. गेल्यावेळी मस्कट येथे झालेल्या या स्पर्धेत हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संयुक्त विजेते ठरले होते. यंदा मात्र दोन्ही संघांना कांस्यपदकासाठी लढावे लागले आणि त्यात वरचढ ठरला, तो भारतीय संघ.
स्पर्धेत संभाव्य विजेता असलेल्या भारतीय संघाने अपराजित राहताना दिमाखात उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, या निर्णायक सामन्यात आशियाई क्रीडा सुवर्ण विजेत्या जपानकडून भारतीयांना ५-३ असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, दक्षिण कोरियाने अंतिम फेरीत धडक मारताना पाकिस्तानला नमवले होते.
कांस्यपदकाच्या लढतीत भारताने अपेक्षित आक्रमक सुरुवात करताना पहिल्याच मिनिटाला गोल करीत आघाडी मिळविली. हरमनप्रीत सिंगने केलेल्या शानदार गोलने पाकिस्तानवर दडपण आणले होते. यानंतर मात्र पाकिस्तानने जबरदस्त मुसंडी मारताना २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. अफराजने दहाव्या मिनिटाला, तर अब्दुल राणाने ३३ व्या मिनिटाला गोल करीत भारतीयांवर दबाव आणला. पाकिस्तानने भक्कम बचावासह आक्रमक चाली रचताना भारतीयांना सावध पवित्रा घेण्यास भाग पाडले; परंतु ४५ व्या मिनिटाला अनुभवी सुमितने गोल करीत भारताला बरोबरी साधून दिल्यानंतर ५३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरची संधी अचूक साधलेल्या वरुण कुमारने भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. या जोरावर आक्रमक पवित्रा घेत भारताने पाकिस्तानला पुनरागमनाची संधी न देण्याचा प्रयत्न केला. त्यातच ५७ व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने शानदार मैदानी गोल करीत भारताची आघाडी ४-२ अशी भक्कम केली.
अखेरची ३ मिनिटे बाकी असताना अहमद नदीमने गोल करीत पाकिस्तानची पिछाडी ३-४ अशी कमी केली. यावेळी पाकने आक्रमक पवित्रा घेत भारतीय क्षेत्रात सातत्याने मुसंडी मारली; परंतु भारताने भक्कम बचाव करीत पाकचे आक्रमण परतावले.
भारतीयांनी चेंडूवर अधिक वेळ नियंत्रण ठेवले असले तरी, पाकिस्तानने शानदार आक्रमक चाली रचत भारताच्या बचावफळीची परीक्षा पाहिली. पाकिस्तानचा बचाव भेदण्यात भारतीयांना अनेकदा झुंजावे लागले. कर्णधार मनप्रीत सिंगने शानदार नेतृत्त्व केले. सामन्यात ग्रीन कार्ड मिळाल्याने त्याला १० मिनिटे मैदानाबाहेरही बसावे लागले. मात्र, तरीही भारतीयांनी आपल्या खेळावर पूर्ण लक्ष देताना पाकिस्तानला वरचढ होऊ दिले नाही. कर्णधार मनप्रीतला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
११ पैकी २ पेनल्टी कॉर्नर सत्कारणी
भारताच्या पेनल्टी कॉर्नरवरील मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. पाकिस्तानविरुद्ध भारतीयांनी तब्बल ११ पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र, यापैकी त्यांना केवळ दोन वेळाच गोल करण्यात यश आले. पहिल्याच क्वार्टरमध्ये चार पेनल्टी कॉर्नर मिळवलेल्या भारतीयांनी एक गोल करत आघाडी मिळवली होती. पाकिस्तानचा गोलरक्षक अमजद अली याने शानदार बचाव करताना भारताचे अनेक आक्रमण रोखले.
कोरियाने जिंकले सुवर्णपदक!
निर्धारीत वेळेत सामना ३-३ असा बरोबरीत राहिल्यानंतर कोरियाने पेनल्टी शूटआउटमध्ये जपानला ४-२ असे नमवत सुवर्ण पटकावले. दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करत सामना रोमांचक केला. जपानने उपांत्य फेरीत बलाढ्य भारतीय संघाचा पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे, कोरियाने पाकिस्तानचे कडवे आव्हान परतावत अंतिम फेरीत धडक मारली होती.