भारत-बांगलादेश कसोटी : ही आहेत 10 वैशिष्ट्ये
By Admin | Published: February 8, 2017 04:04 PM2017-02-08T16:04:41+5:302017-02-08T16:04:41+5:30
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघांशी निगडीत असलेल्या 10 रंजक बाबींचा घेतलेला हा आढावा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - कसोटी दर्जा मिळाल्यावर तब्बल 16 वर्षांनंतर कसोटी सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ भारतात आला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघांशी निगडीत असलेल्या 10 रंजक बाबींचा घेतलेला हा आढावा...
1 - भारत आणि बांगलादेशमध्ये आतापर्यंत 8 कसोटी सामने खेळले गेले असून, त्यातील सहा सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, या सहा विजयांपैकी चार वेळा भारताने बांगलादेशला डावाने मात दिली आहे. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
2 - हैदराबाद कसोटीला सुरुवात झाल्यावर भारतात कसोटी सामना खेळणारा बांगलादेश हा नववा कसोटी संघ ठरेल. बांगलादेशच्या आधी कसोटी दर्जा प्राप्त असलेले अन्य 8 संघ भारतात कसोटी सामने खेळले आहेत.
3 - राजीव गांधी स्टेडियम आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजारासाठी लकी आहे. अश्विनने येथे खेळलेल्या दोन कसोटीत 18 बळी टिपले आहेत, तर पुजाराने येथे 181.5 च्या सरासरीने 363 धावा कुटल्या आहेत.
4 - बांगलादेशचा संघ आतापर्यंत परदेशात 44 कसोटी सामने खेळला असून, त्यातील केवळ तीन सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला आहे. त्या पैकी दोन विजय वेस्ट इंडिज आणि एक विजय झिम्बाब्वेविरुद्ध मिळवलेला आहे.
5 - भारत आणि बांगलादेशमधील कसोटी सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने 136.66च्या सरासरीने 820 धावा कुटल्या आहेत. त्यात 5 शतकांचाही समावेश आहे.
6- दोन्ही संघांत झालेल्या कसोटी सामन्यांच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम झहीर खानच्या नावे आहे. त्याने सात सामन्यात 31 बळी टिपले आहेत.
7 - बांगलादेशविरुद्ध होणारा कसोटी सामना कर्णधार म्हणून विराटचा 23वा कसोटी सामना असेल. त्याबरोबरच तो सर्वाधिक सामन्यात कप्तानी करण्याच्या भारतीय कर्णधारांच्या यादीत कोहली नवव्या स्थानी पोहोचेल.
8 - कोहलीचा संघ गेल्या 18 कसोटी सामन्यांपासून भारतीय मैदानात अपराजित आहे. आता अजून दोन सामन्यात अपराजित राहिल्यास सलग 20 सामन्यात अपराजित राहण्याचा 1977 ते 1980 दरम्यानच्या आपल्या जुन्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी भारताकडे असेल.
9 - भारताने विजय मिळवल्यास तो भारताचा घरच्या मैदानावरील 95वा विजय असेल. घरच्या मैदानावर भारतापेक्षा अधिक विजय केवळ ऑस्ट्रेलिया (234), इंग्लंड (207) आणि दक्षिण आफ्रिका (96) या संघांनीच मिळवले आहेत.
10 - बांगलादेशचा शाकिब अल हसन हा एकाच कसोटी सामन्यात शतक आणि 10 बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा जगातील केवळ तिसरा क्रिकेटपटू आहे. शाकिबच्या आधी अशी किमया इयान बॉथम आणि इम्रान खान यांनी केली होती.