भारताचा ऑस्ट्रेलियाकडून २५ धावांनी पराभव
By admin | Published: January 20, 2016 04:44 PM2016-01-20T16:44:50+5:302016-01-20T18:34:52+5:30
सलग तीन सामन्यातील पराभवांमुळे मालिका गमाविणा-या भारतीय संघाचा पुन्हा ऑस्टेलिया संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात २५ धावांनी पराभव केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
कॅनबेरा, दि. २० - सलग तीन सामन्यातील पराभवांमुळे मालिका गमाविणा-या भारतीय संघाचा पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात २५ धावांनी पराभव केला. या पराभवामुऴे भारतीय फलंदाज शिखर धवन आणि विराट कोहली यांची शतकी खेऴी व्यर्थ ठरली.
चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या ३४९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या फलंदाजांनी सुरुवातीला दमदार फलंदाजी केली, मात्र मधल्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीमुऴे भारताला या सामन्यात सुद्धा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, या पराभवाची जबाबदारी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्विकारली आहे.
भारताचा फलंदाज शिखर धवन आणि विराट कोहली यांनी शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनने आपल्या कारकिर्दीतील नववे शतक झळकाविले. शिखर धवनने ११३ चेंडूत १४ चौकार लगावत २ षटकारांसह १२६ धावा केल्या, तर विराट कोहलीने ९२ चेंडूत १०६ धावा केल्या. रोहित शर्मा ४१ धावांवर बाद झाला, त्याला रिचर्डसनने झेलबाद केले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी (०), गुरकिरत मान (५)अजिंक्य रहाणे (२), ऋषी धवन (९), भुवनेश्वर कुमारने २ धावा केल्या तर उमेश यादवही २ धावा करुन तंबूत परतला.
सलामीवीर एरॉन फिंच (१०७) शतकी खेळी आणि डेव्हीड वॉर्नरच्या (९३) धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३४८ धावांचा पल्ला गाठला. एरॉन फिंचच्या शतकी खेळीनंतर त्याला भारतीय गोलंदाज उमेश यादवने इशांत शर्मा करवी झेलबाद केले. तर वॉर्नरला इशांत तर, फिंचला हाणामारीच्या षटकात मॅक्सवेलने २० चेंडूत (४१) आणि कर्णधार स्मिथनेही २९ चेंडूत (५१) धावा तडकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ३५० पर्यंत पोहोचता आले. पहिल्या तीन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाज झगडताना दिसले. मात्र यात त्यांना अपयश आल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखणे त्यांना जमले नाही. मार्शने (३३), बेलीने (१०) धावा केल्या. हाणामारीच्या षटकात फॉकनर आणि वाडे भोपळाही न फोडता तंबूत परतले. इशांत शर्माने सर्वाधिक चार गडी बाद केले असले तरी त्यासाठी त्याने १० षटकात ७७ धावा मोजल्या. उमेश यादवे १० षटकात ६७ धावा देत तीन गडी बाद केले.