भारताची बांगलादेशवर मात
By admin | Published: March 16, 2016 08:39 AM2016-03-16T08:39:48+5:302016-03-16T08:39:48+5:30
कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेलास्वामी वनिता व वेदा कृष्णमूर्ती यांच्या फलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने बांगलादेश संघावर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळविला.
बंगळुरू : कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेलास्वामी वनिता व वेदा कृष्णमूर्ती यांच्या फलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने बांगलादेश संघावर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळविला.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. भारताने बांगलादेशचा निर्णय चुकीचा ठरवित पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची सलामी दिली. मिताली राजने ३५ चेंडूंत ५ चौकारांच्या सहाय्याने ४२, तर वेलास्वामी वनिताने २४ चेंडूंत ७ चौकारांच्या सहाय्याने ३८ धावा केल्या. हरमनप्रीत कौरने २९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने ४०, तर वेदा कृष्णमूर्तीने २४ चेंडूंत नाबाद ३६ धावा टोलवित संघाचा धावफलक २० षटकांत ५ बाद १६३ धावांवर नेला. फहीमा खातून व रूमाना अहमदने प्रत्येकी २ बळी घेतले. विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या बांगलादेशचा डाव २० षटकांत ५ बाद ९१ धावांत संपुष्टात आला. शर्मिन अख्तर (२७ चेंडूंत २१) व निगर सुलताना (२५ चेंडूंत नाबाद २७) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत.
धावफलक : भारत : २० षटकांत ५ बाद १६३, मिताली राज ४२, वेलास्वामी वनिता ३८, हरमनप्रीत कौर ४०, वेदा कृष्णमूर्ती नाबाद ३६, फहिमा खातुन २/३१, रूमाना अहमद २/३५; बांगलादेश : २० षटकांत ५ बाद ९१, शर्मिन अख्तर २१, निगर सुलताना नाबाद २७, फहिमा खातुन १४, पूनम यादव २/१७, अनुजा पाटील २/१६.