भारतानं बांगलादेशला चिरडलं, थाटात फायनलमध्ये प्रवेश

By admin | Published: June 15, 2017 09:36 PM2017-06-15T21:36:27+5:302017-06-15T22:38:16+5:30

भारत आणि बांगलादेशमध्ये उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या लढतीत 265 धावांचा पाठलाग करताना भारतानं चांगली सुरुवात केली

India beat Bangladesh, enter final | भारतानं बांगलादेशला चिरडलं, थाटात फायनलमध्ये प्रवेश

भारतानं बांगलादेशला चिरडलं, थाटात फायनलमध्ये प्रवेश

Next
ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 15 -  चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेशमध्ये उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या लढतीत 265 धावांचा पाठलाग करताना भारतानं 9 गडी राखून विजय मिळवत फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. भारताकडून मैदानावर आलेला शिखर धवन 34 चेंडूंत 7 चौकार आणि एक षटकार लगावत 46 धावा काढून तंबूत परतला. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी सामन्यावर मजबूत पकड मिळवली. रोहित शर्मानं आतापर्यंत 123 धावा काढून शतक पूर्ण केलं. तर विराट कोहलीनेही अर्धशतक पूर्ण करत 96 धावा केल्या आहेत. कोहली आणि शर्मानं सर्वाधिक 178 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. बांगलादेशकडून मूर्तझाला धवनचा एक बळी मिळवण्यात यश आलं आहे. रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच या किताबानं सन्मानित करण्यात आलं आहे. 

तत्पूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले होते. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहिमने 123 धावांच्या केलेल्या भागीदारीमुळे बांगलादेशने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजीमध्ये चातुर्याने केलेले बदल आणि मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी केलेला टिच्चून मारा याच्या जोरावर भारताने बांगलादेशला 7 बाद 264 धावांवरच रोखले होते. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या भारताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न बांगलादेशी फलंदाजांनी केला होता. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल (70) आणि मुशफिकूर रहिम (61) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 123 धावांच्या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने 2 बाद 150 अशी मजल मारली होती. 

पण ही जोडी धोकादायक ठरतेय असे वाटत असतानाच विराटने केदार जाधवच्या हाती चेंडू दिला. मग केदारने तमीम आणि मुशफिकूरची विकेट काढत भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. शाकिब अल हसन (15) आणि महमदुल्ला (21) हेही झटपट बाद झाल्याने बांगलादेशच्या डावाला ब्रेक लागला. अखेर निर्धारित 50 षटकात त्यांना 7 बाद 264 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन तर, रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.
 
 
 

 

 

 

Web Title: India beat Bangladesh, enter final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.