बांगलादेशला चिरडून भारत अंतिम फेरीत

By admin | Published: June 16, 2017 12:09 AM2017-06-16T00:09:30+5:302017-06-16T00:09:30+5:30

अपघाताने सेमीफायनलमध्ये पोहचलेला बांगलादेश आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार भारत यांच्यातील सामना तसा एकतर्फीच झाला

India beat Bangladesh in final | बांगलादेशला चिरडून भारत अंतिम फेरीत

बांगलादेशला चिरडून भारत अंतिम फेरीत

Next

विश्वास चरणकर/आॅनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 15 - अपघाताने सेमीफायनलमध्ये पोहचलेला बांगलादेश आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार भारत यांच्यातील सामना तसा एकतर्फीच झाला. भारताने चॅम्पियन्ससारखा खेळ करीत बांगलादेशला ९ विकेटसनी हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. आता भारताचा महामुकाबला पाकिस्तानशी होणार असल्याने त्याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य सामना एकतर्फी होणार असे सर्वांनाच वाटत होतं. परंतु बांगलादेशाने एक झुंजार संघ म्हणून अलिकडच्या काळात आपली ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे हा संघ भारताला भिडेल अशी नकळत शंका वाटत होती. तशी संधी बांगलादेशला आलीही होती, परंतु पूर्णपणे व्यावसाईकपणा अंगात भिनलेल्या भारतीय संघाने आपला अनुभव पणाला लावत बांगलादेशकडून ती संधी हिरावून घेतली. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा विराटचा निर्णय भुवनेश्वरने सार्थ ठरवला. ढगाळ वातावरणाने त्यांना चांगली साथ दिली. सलामीवीर सौम्या सरकार आणि फटकेबाजीस उताविळ झालेल्या शब्बीरला तिशीच्या आतबाहेर बाद करुन बांगलादेशला धक्के दिले. जसप्रित बुमराहने टिच्चून मारा करताना फलंदाजांना फटकेबाजीचे स्वातंत्र्य दिले नाही. सलामीवीर तमिम इक्बाल आणि मशफिकुर रेहमानने काळाची पावले ओळखून सावध खेळी केली. मैदानावर पाय रोवण्यात ते यशस्वी झाले. भुवी-बुमराहचा स्पेल संपल्यावर त्यांनी आपल्या खेळाचा वेग वाढवला. दोघांनी जवळपास सहाच्या सरासरीने शतकी भागीदारी केली. २७व्या षटकांत संघाचे दीडशतक फलकावर लागल्याने बांगलादेश तिनशेचा आकडा पार करण्याची संधी मिळाली होती. पण भारताने चतुराईने त्यांच्याकडून ही संधी हिरावून घेतली.

तमिम-मशफिकूरची जोडी डोकेदुखी ठरत आहे असे वाटत असताना विराटने आॅफस्पीनर केदार जाधवच्या हातात चेंडू सोपवला. केदारने तमिम (७0) आणि मशफिकुर (६१) यांना बाद करुन सामन्याच्या दोऱ्या भारतीयांच्या हातात सोपवल्या. तमिम-मशफिकूरची जोडी मैदानावर असतानाच बांगलादेशचे सामन्यात अस्तित्व दिसत होते. पण यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व राखत त्यांना २६४ धावांत रोखले. भारतीय गोलंदाजांचे आज एका विशेष गोष्टीसाठी कौतुक करावे लागेल ते म्हणजे त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक गोलंदाजी केली. बळी मिळत नाही म्हंटल्यावर त्यांनी गोलंदाजांच्या धावांना लगाम घातला. धावांची कोंडी झाल्यावर फलंदाज खराब फटका खेळतो आणि बाद होतो. शब्बीर रेहमानचा बळी हा त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. तो पॉवरप्लेचा फायदा घेत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करीत होता. एक दोनदा तो यशस्वीही झाला, त्यावेळी गोलंदाजांनी आपली चाल बदलली. तो पुढे येणार हे गृहीत धरुन त्याच्यावर आखूड टप्प्याचा मारा केला. यामुळे बुमराह आणि भुवनेश्वरचे सलग आठ चेंडू डॉट घालवल्याने शब्बीरचा तोल ढासळला आणि नवव्या चेंडूवर तो जाळ्यात अडकला. आॅफस्टम्पच्या बाहेरील चेंडू त्याने पॉर्ईंटवरील जडेजाच्या हातात मारला, अन जडेजाने अलगद झेलला. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर बलाढ्य भारतीय फलंदाजांसाठी हे लक्ष्य तसे सामान्यच होते. त्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा हे सलामीवीर सेट झाले तर टार्गेट आणखीनच छोटे होते. शिखर-रोहित जोडीने जवळपास शतकाचा प्लॅटफॉर्म तयार केल्यावर विराटने त्यावर मजले चढविले. धवन या स्पर्धेत पहिल्यांदाच पन्नाशीच्या आत बाद झाला. पण पाकिस्तानविरुध्द धावचित झाल्याने हुकलेल्या शतकाची संधी रोहितने आज गमावली नाही. त्याने शतक तर साकारलेच शिवाय शेवटपर्यंत नाबाद रहात विजयाचा साक्षीदारही बनला. सामन्यात भारताचा विजय तर पक्का होताच पण तो निश्चित झाल्यावर उत्सुकता होती ती विराटच्या शतकाची. त्याच्या शतकाला चार धावा कमी पडल्यावर असे वाटत होते की, बांगलादेशला आणखी दहाबारा धावा काढू दिल्या असत्या तर बरे झाले असते. पण गमतीचा भाग सोडूया. भारताने चॅम्पियन्सप्रमाणे खेळ करीत पुन्हा चॅम्पियन्स बनण्याच्यादृष्टीने आणखी एक पाउल टाकले. आता गरज आहे ती केवळ एक धक्का देण्याची त्यासाठी रविवारची वाट पाहुया.

Web Title: India beat Bangladesh in final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.