भारताची नेपाळवर २-० गोलने मात
By admin | Published: June 7, 2017 12:44 AM2017-06-07T00:44:30+5:302017-06-07T00:44:30+5:30
भारतीय फुटबॉल संघाने किर्गिस्तानविरुद्ध होणाऱ्या एएफसी आशिया चषक पात्रता फेरीची भक्कम तयारी करताना मंगळवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात नेपाळचा २-० ने पराभव केला
मुंबई : भारतीय फुटबॉल संघाने किर्गिस्तानविरुद्ध होणाऱ्या एएफसी आशिया चषक पात्रता फेरीची भक्कम तयारी करताना मंगळवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात नेपाळचा २-० ने पराभव केला. फिफा क्रमवारीत भारत १०० व्या तर नेपाळ १६९ व्या स्थानावर आहे.
भारतीय खेळाडूंनी या सामन्यावर बराच वेळ वर्चस्व गाजविले. खाते उघडण्यासाठी मात्र उत्तरार्धातील १५ मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. बचावफळीतील संदेश झिंगण याने पहिला गोल केला.
सामना संपायला ११ मिनिटे शिल्लक असताना मिडफिल्डर जेजे लालपेखलुआ याने आणखी एक गोल नोंदवित विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात स्टार स्ट्रायकर सुनील छेत्रीसह काही दिग्गजांना विश्रांती देत कोच स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी युवा खेळाडूंना संधी दिली.
भारताने विजय नोंदविला तरी विजयावर कोच समाधानी नव्हते. आक्रमक फळीतील रॉबिनसिंग याने अनेक संधी गमविल्या. शिवाय इतर खेळाडूंकडूनही अनेक चुका झाल्या. भारताला १३ जून रोजी बेंगळुरु येथे किर्गिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. (वृत्तसंस्था)