आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी: भारताचे जपानविरुद्ध अर्धा डझन गोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 08:14 AM2021-12-20T08:14:52+5:302021-12-20T08:15:51+5:30
जबरदस्त लयीमध्ये असलेला भारताचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारताने जपानला ६-० असे लोळवले.
ढाका : जबरदस्त लयीमध्ये असलेला भारताचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारताने जपानला ६-० असे लोळवले. या दणदणीत विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत अपराजित राहताना साखळी फेरीत एकही सामना गमावला नाही.
हरमनप्रीतने दहाव्या आणि ५३व्या मिनिटाला गोल केला. याशिवाय दिलप्रीत सिंग (२३ व्या मिनिटाला), जरमनप्रीत सिंग (३४), सुमित (४६) आणि शमशेर सिंग (५४) यांनीही प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात हातभार लावला. स्पर्धेत याआधीच भारताने उपांत्य फेरी निश्चित केली होती. त्यामुळे जपानविरुद्ध मिळालेली सरावाची संधी भारताने सोडली नाही. पाच देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ आता १० गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. भारतानंतर कोरिया (६), जपान (५), पाकिस्तान (२) आणि यजमान बांगलादेश (०) यांचा क्रमांक आहे.
सलामीला कोरियाविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागलेल्या भारताने सलग तिसरा विजय मिळवत दणक्यात पुनरागमन केले. भारतीय संघाला उपांत्य फेरीत मंगळवारी जपानविरुद्ध खेळायचे आहे. स्पर्धेत राखलेल्या एकूण वर्चस्वाच्या जोरावर भारतीयांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. पहिल्या क्वॉर्टरपासून आक्रमक खेळ केलेल्या भारतीयांनी वेगवान खेळ करताना जपानला दबावात ठेवले. जपानने आक्रमक खेळ करताना भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीयांचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना सातत्याने अपयश आले.