इंडिया ब्लू बनली चॅम्पियन
By admin | Published: September 15, 2016 12:10 AM2016-09-15T00:10:44+5:302016-09-15T00:26:05+5:30
रवींद्र जडेजा आणि कर्ण शर्मा यांच्या सुरेख गोलंदाजीसमोर शिखर धवन आणि युवराजसिंगसारख्या दिग्गजांचा समावेश असलेल्या इंडिया रेड संघाने दुलीप करंडक फायनल लढतीच्या अखेरच्या दिवशी पूर्णपणे शरणागती पत्करली
ग्रेटर नोएडा : रवींद्र जडेजा आणि कर्ण शर्मा यांच्या सुरेख गोलंदाजीसमोर शिखर धवन आणि युवराजसिंगसारख्या दिग्गजांचा समावेश असलेल्या इंडिया रेड संघाने दुलीप करंडक फायनल लढतीच्या अखेरच्या दिवशी पूर्णपणे शरणागती पत्करली. या एकतर्फी लढतीत इंडिया ब्लू संघाने ३५५ धावांनी शानदार विजय मिळवताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
भारतीय संघात सातत्याने दुर्लक्षित करण्यात आलेल्या गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लूने सामन्याच्या अखेरच्या दिवशी टीम रेडसमोर विजयासाठी ५१७ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले होते; परंतु
इंडिया रेड स्टार खेळाडूंच्या उपस्थितीनंतरही दुसऱ्या डावात ४४.१ षटकांत १६१ धावांत ढेपाळली.
मोठ्या लक्ष्यासमोर इंडिया रेड फलंदाजांनी झुंजार फलंदाजी केली नाही. त्यांच्याकडून मधल्या
फळीतील फलंदाज गुरकीरतसिंग याने सर्वाधिक ३९ धावा केल्या. त्यांच्या ४ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
सलामीवीर अभिनव मुकुंद रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर शिखर धवनवर अपेक्षा होत्या; परंतु खराब फॉर्मनंतरही न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत स्थान कायम ठेवणाऱ्या धवनला फक्त २९ धावा काढता आल्या. शिखरने ५० चेंडूंत ३ चौकार मारले. त्याला परवेझ रसूलने गंभीरकरवी झेलबाद केले. कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू युवराजदेखील मोठी खेळी न करता जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. युवराज २१ धावा काढू शकला. सुदीप चॅटर्जीने १४ धावा केल्या, तर कसोटी संघाबाहेर फेकले गेलेले स्टुअर्ट बिन्नी, लेगस्पिनर अमित मिश्रा आणि प्रदीप सांगवान यांना भोपळाही फोडता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
इंडिया ब्लू पहिला डाव : ६ बाद ६९३ (घोषित). दुसरा डाव ५ बाद १७९ (घोषित). (मयंक अग्रवाल ५२, गौतम गंभीर ३६, रोहित शर्मा नाबाद ३२. कुलदीप यादव ३/६२, अमित मिश्रा १/२४).
इंडिया रेड (पहिला डाव) ३५६ व दुसरा डाव : ४४.१ षटकांत सर्व बाद १६१. (गुरकीरतसिंग ३९, शिखर धवन २९, युवराजसिंग २१, कुलदीप यादव २४. रवींद्र जडेजा ५/७६, कर्ण शर्मा ३/३३, परवेझ रसूल १/३१).